आनंद हा बाहेरून येत नाही; तो आपल्या आतून येतो
कोणताही माणूस नुसता हाडामासाचा गोळा नसतो. माणसाचं बाह्यरूप हे डोळ्याने दिसणारे भौतिक स्वरूप आहे. पण माणूस फक्त भौतिक स्वरुपापुरता सिमीत नाही. तर त्या पलीकडे तो अफाट पसरलेल्या समुद्रासारखा आहे. ते अफाट रूप म्हणजे ते त्याचं मानसिक जग आहे. ज्याविषयी माणसाला फारच थोडी माहिती असते. बहुधा आपल्यापकी लोक आकाशातील ग्रहाचे, जमिनीतील खडकांचे, माहिती तंत्रज्ञांचे ज्ञान सतत आत्मसात करून स्वतःला अद्यावत करीत असतात; पण स्वतःविषयी फारच अज्ञानी असतात. अशा व्यक्तींना स्वतःविषयी बोलण्यास सांगितल्यास फारच अल्प माहिती सांगू शकतात. परंतु एखाद्या विषयावर हिच व्यक्ती तास-दोन तास अगदी भरभरून बोलत असतात. आपण स्वतःविषीयी इतके अनभिज्ञ का असतो? हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे. खरं तर जन्मापासुन माणुस हा बहिर्मुखी असतो. त्यामुळे तो सतत बाहेरील गोष्टी अनुभवत असतो. आपल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तो बाह्य जगात शोधतो. आपल्या जीवनातील समस्यांना देखील तो बाह्य जगातील लोकांना जबाबदार मानतो. तो कधी स्वतःच्या आत डोकावून पाहण्यास तयार नसतो. काही चांगल्या गोष्टी घडल्या की त्याचं श्रेय स्...