आर्थिक मानसशास्त्र
मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोन्ही शाखा मानवाचा अभ्यास करतात. बाजारात वस्तूची निवड करणे, वस्तूची इतर वस्तूंशी तुलना करणे, वस्तू खरेदी करणे, तिचा उपयोग करणे ह्या सर्व गोष्टी वर्तनात समाविष्ट असतात. वस्तूची खरेदी जसे वर्तनाचा भाग आहे, तसेच वस्तूच्या उपभोगातून मिळणारा आनंद देखील वर्तनाचाच एक भाग आहे. माणसाची आर्थिक प्रगती त्याची विचार प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, समस्यांचे आकलन यासारख्या अनेक मानसिक प्रक्रियांवर अवलंबून असते. आर्थिक मानसशास्त्र हि आंतरविद्याशाखीय एक महत्वाची अभ्यास शाखा आहे. ज्यामध्ये, माणसाच्या आर्थिक वर्तणुकीचा त्याच्या मनाच्या अवस्थांवर, आर्थिक स्थितीवर, व्यक्तीच्या सामाजिक स्थानावर, वैयक्तिक वर्तन आणि मानसिक जीवनावर होणारा परिणाम व कारणांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जातो. शासनाचे आर्थिक धोरण यशस्वी होण्यासाठी मानसशास्त्रीय घटक अत्यंत महत्वाचे असतात. त्यात देशातील लोकांचा सरकारच्या आर्थिक धोरणांवर विश्वास आहे का? ग्राहक आशावादी आहेत कि निराशावादी आहेत? शासनाच्या आर्थिक धोरणांचा लोकांची बचत आणि कर्जावर काय परिणाम होतो...