मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह

मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह 

डॉ. नागोराव डोंगरे 
विभाग प्रमुख, मानसशास्त्र विभाग 
एस.पी .डी .एम .महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे (महाराष्ट्र) 

मानसशास्त्र, मानवी मन आणि वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे. त्यामुळे मानसशास्त्र हा मानवी वर्तनाचे बहुविध पैलू अभ्यासणारा, दैनंदिन जीवनाशी निगडीत असणारा, माणसाला वेळोवेळी मार्गदर्शन करणारा आणि जीवनात अधिकाधिक आनंद वाढविणारा एक  महत्वाचा  विषय आहे. माणसाच्या जगण्याचा अंतिम हेतू काय? असा प्रश्न जर कोणी विचारला, तर याचे उत्तर व्यक्तिपरत्वे भिन्न असू शकते. पण आनंद मिळविणे हा प्रत्येकाच्या जीवनाचा अंतिम हेतू असलेला बघावयास मिळतो.
      आपण बघत आहोत की, औधोगिक क्रांती, माहिती तंत्रज्ञान यांनी माणसाचं संपूर्ण जीवन व्यापून टाकलं आहे. अगदी छोट्या बाळापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रत्येक हाती हल्ली स्मार्ट फोन दिसतो.  फेसबुक, इंस्टाग्राम, व्हाट्सअप  सारख्या समाज माध्यमांवर सगळ्यांना फोटो, व्हिडिओ शेअर करण्याचा मोह आवरत नाही. व्हाट्सअप ग्रुपवरची खडाजंगी चर्चा, वाक्ययुद्ध, आचकट-विचकट मॅसेज, खोटे मॅसेज यावरून लोकांमध्ये तुडुंब वैचारिक वाद होतात. समाज माध्यमांचा वापर करणारे लोक नागरिक कमी आणि राजकीय पक्षांचे अजाण कार्यकर्ते बनू पाहत आहेत. प्रत्येक घरात मोबाईल घेऊन बसणारे लोक दिसतात. घरातला संवाद कमी होतोय, मुले अभ्यासापासून लांब जात आहेत, विसंवादातून भांडणे वाढू लागली आणि वर्तनाच्या नवनवीन समस्या जन्म घेत आहेत.
     दिवसेंदिवस कमी होणारा पाऊस व उन्हाचा वाढता तडाखा शेती व पर्यावरणाच्या समस्या निर्माण करतोय. खेड्यात रोजगाराची मारामार म्हणून मजूर वर्ग शहरांकडे धाव घेतो. परंतु शहरात मशिनरींचा वाढता वावर असंघटित क्षेत्रातला रोजगार कमी करतो आहे. शेतीची नापिकी शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत ढकलते. शेतकरी आत्महत्या त्याचाच परिपाक आहे.  खेड्यातून शहरात रोजगारासाठी आलेला  मजूर दुकाने, बांधकाम, कारखाने, घरगुती कामे आणि रोजंदारीने होणारा निवडणूक प्रचार नाखुषीने करू लागतो. कामातला आनंद नोकरीत परिपूर्णता आणतो. नुसते जगणे आणि आनंदाने जगण्यात खूप फरक आहे. मनासारख्या गोष्टी घडल्यास, ध्येय पूर्ण झाल्यास, स्वप्न साकार झाल्यास माणसाचा आनंद वाढतो. आनंदी माणूस इतर लोकांशी बोलतांना, काम करताना आनंदाचे वितरीत करीत असतो. नाराज, दुःखी माणूस वागण्या-बोलण्यातून नाराजी, दुःख वितरीत करीत असतो. लोकांच्या जगण्यातला आनंद कमी होणे हि एक वर्तनात्मक समस्या होत आहे.
     कार्यालयांमध्ये कॉम्पुटर, कारखान्यात रोबोट्सचा वाढता वापर अनेक नोकऱ्या गिळू लागला आहे. येणारे प्रत्येक शासन खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण (खाऊजा) यासारखे धोरण राबविते. खाजगीकरणाच्या माध्यमातून  अनेक शासकीय उद्योग बड्या-बड्या उधोगपतींच्या मालकीचे होत आहेत. खाजगी कंपन्यांमध्ये  शासनाचे जातीनिहाय आरक्षण, स्त्रियांचे आरक्षण, दिव्यांगांचे आरक्षण धोरण लागू होत नाही. थोड्याफार सरकारी नोकऱ्या असतात त्या नोकरभरती बंद असल्यामुळे मिळू शकत नाही. बेरोजगारी लोकांमध्ये ताण, नैराश्य, आत्महत्या ह्यासारख्या वर्तन समस्या निर्माण करीत आहे.
     त्यामुळे लोकांच्या मनातील परस्परांविषयीचा संताप, चीड, व्देष, भीती, अविश्वास वाढतो आहे. नातेवाईक, शेजारी, कामावरील सहकारी, मित्र यांच्यामधील अंतर दिवसेंदिवस वाढू लागले. विश्वासाची जागा अविश्वास, प्रेमाची जागा मत्सर, प्रामाणिकपणाची जागा भ्रष्ट्राचार, त्यागाची जागा भोग आणि माणुसकीची जागा आता पैसा घेऊ लागला आहे. घरा-घरात प्रेम, माया, ममतांचा ओलावा आटतो आहे. पालक आपल्या घरात मुलांना  सांभाळण्यापेक्षा भावी डॉक्टर, इंजिनिअर यांचे संगोपन करू लागलेत की काय अशी शंका येते. आपल्याच मुलांकडे माणूस म्हणून नाही तर अपेक्षा पूर्ण करणारे एक  मशीन म्हणून पालक पाहू लागलेत.
    जीवनातील समस्या स्व परिश्रमाने सोडविण्यात असफल ठरलेला माणूस धर्म, अध्यात्म्य यामध्ये स्वतःला गुंतवीत असतो. तेथे काही मार्ग सापडेल का? हा विचार करीत असतो. परंतु  प्रत्येक धर्मातील नैतिक वागणूक (धार्मिक आचरण)  कमी होऊन त्याची जागा गंध-टिळे, माळा, फोटो, ताईत, गंडे-दोरे, अंगठी, कडे, दाढी, फेटे, अन्नपदार्थ आणि पोशाख यासारख्या कर्मकांडांनी यांनी घेतली. त्यामुळे नैतिकता, सदाचार, त्याग, आध्यत्म वैगेरे ह्या गोष्टी धार्मिक उपक्रमातून हद्दपार दिसतात. ढोंगी बाबांचा वाढता अनुयायी वर्ग, प्रसार माध्यमांच्या साथीने त्यांचा वाढता धार्मिक व्यवसाय, धर्माचा राजकारणासाठी होणारा  वापर अध्यात्मिक अधःपतनासाठी कारणीभूत होत आहेत. त्यामुळे अध्यात्मामधुन समाधान, सुख आणि दुःखापासून मुक्ती मिळेलच याची खात्री देता येत नाही. समाजात निर्माण झालेली हि नवीन आव्हाने मानसशास्त्रासाठी अभ्यासाची नवीन दालने खुली करीत आहेत. त्याचा आढावा आपण मानसशास्त्रातील नवीन विचारप्रवाह या ब्लॉगवर घेणार आहोत. 

क्रमशः  









       

Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती