आर्थिक मानसशास्त्र

मानसशास्त्र आणि अर्थशास्त्र ह्या दोन्ही शाखा मानवाचा अभ्यास करतात. बाजारात वस्तूची निवड करणे, वस्तूची इतर वस्तूंशी तुलना करणे, वस्तू खरेदी करणे, तिचा उपयोग करणे ह्या सर्व गोष्टी वर्तनात समाविष्ट असतात. वस्तूची खरेदी जसे वर्तनाचा भाग आहे, तसेच वस्तूच्या उपभोगातून मिळणारा आनंद देखील वर्तनाचाच एक भाग आहे. माणसाची आर्थिक प्रगती त्याची विचार प्रक्रिया, निर्णय प्रक्रिया, समस्यांचे आकलन यासारख्या अनेक मानसिक प्रक्रियांवर अवलंबून असते. आर्थिक मानसशास्त्र हि आंतरविद्याशाखीय एक महत्वाची अभ्यास शाखा आहे. ज्यामध्ये, माणसाच्या आर्थिक वर्तणुकीचा त्याच्या मनाच्या अवस्थांवर, आर्थिक स्थितीवर, व्यक्तीच्या सामाजिक स्थानावर, वैयक्तिक वर्तन आणि मानसिक जीवनावर होणारा परिणाम व कारणांचा आंतरविद्याशाखीय अभ्यास केला जातो. 
  शासनाचे  आर्थिक धोरण यशस्वी होण्यासाठी मानसशास्त्रीय घटक अत्यंत महत्वाचे असतात. त्यात देशातील लोकांचा सरकारच्या आर्थिक धोरणांवर विश्वास आहे का? ग्राहक आशावादी आहेत कि निराशावादी आहेत? शासनाच्या आर्थिक धोरणांचा लोकांची बचत आणि कर्जावर काय परिणाम होतो? जाहिरातींचा व ब्रॅण्डेड वस्तूंचा ग्राहकाच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो? ह्या गोष्टींचा अभ्यास करतात. यावरून  मानसशास्त्र हा अर्थशास्त्राचा अविभाज्य भाग असल्याचे सिद्ध होते. ग्राहक, करदाता, उद्योजक आणि इतर आर्थिक एजंट जे निर्णय घेतात, ते सर्व निर्णय त्यांची समजूत, आर्थिक तथ्यांचे मूल्यांकन आणि भविष्यातील घडामोडींबद्दलच्या त्यांच्या स्वतःच्या अपेक्षा यावर ते  अवलंबून असतात. 
       आर्थिक मानसशास्त्र हे असे शास्त्र आहे, जे व्यक्ती, लहान गट (उदा. कुटुंबे, संस्था) आणि मोठ्या प्रमाणात व्यक्तींच्या  (संपूर्ण ग्राहक) आर्थिक वर्तनाचे वर्णन, स्पष्टीकरण आणि भाकीत करते. आर्थिक मानसशास्त्रज्ञ माणसाच्या आर्थिक वर्तनाचा अभ्यास करतात, म्हणजेच ते लोकांची वेळ,  पैसा, प्रयत्न आणि खर्च यांची बचत करतात. ते आर्थिक वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी मुख्यतः मानसशास्त्रीय सिद्धांत आणि संकल्पना यांचा वापर करतात. यावरून हे स्पष्ट होते की, मानसशास्त्र माणसाचे आर्थिक वर्तन समजून घेण्यासाठी अपरिहार्य आहे. आर्थिक वर्तन माणसाची आर्थिक व सामाजिक दर्जाची पुनर्रचना करीत असते. काही लोकांच्या जीवनात नैतिकता  आणि प्रेमळपणा ह्या गोष्टी समाविष्ट करण्यासाठी त्यांच्या  आर्थिक वर्तनाची पुनर्रचना करणे आवश्यक असते.  
     मानसशास्त्रीय संकल्पना आर्थिक संकल्पना समजून घेण्यामधील लोकांची अभिरूची वाढवितात. थोडक्यात मानसशास्त्र हे अर्थशास्त्राच्या हाडांना मास जोडण्याचे काम करते.  नवं अर्थशास्त्र हे जास्तीत जास्त उपभोगाचे जग आहे. वैयक्तिक ग्राहक, उद्योजक जास्तीत जास्त उपभोग घेणारे असतात, त्यामुळे ते तर्कसंगत, अहंकारी आणि व्यक्तिवादी असतात. हा दृष्टीकोन अगदी टोकापर्यंत गेल्यास, स्वतःला अधिकाधिक नफा मिळविण्यासाठी आणि लागत कमी करण्यासाठी लोक इतरांवर स्वार होण्यास मागे पुढे पाहत नाहीत. तर्क विचार, प्रेम, निष्ठा, परोपकार आणि वचनबद्धता यांचा दैनंदिन व्यवहारात फारसा वापर केला जात नाही. खाओ-पिओ मौज करो यावर नवं अर्थशास्त्र अधिक जोर देत आहे.
     आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक मानसशास्त्र वस्तू खरेदीचा निर्णय घेताना लोक कोणत्या चुका करतात याचे विश्लेषण करते. साधारणपणे लोकांकडून बहुतेक वेळा पद्धतशीर चुका (Systematic errors) किंवा पूर्वग्रहीत चुका (biases recur) घडतात. काही लोकांकडून अशा चुका काही विशिष्ट् परिस्थितीत वारंवार घडतात. आर्थिक मानसशास्त्राचा उपयोग खरेदी वर्तनातील लोकांच्या चुका कमी करण्यासाठी होऊ शकतो. त्यामुळे पैसा शहाणपणाने खर्च करण्याची अंतदृष्टी लोकांमध्ये निर्माण होते.  पैसा समजून-उमजून खर्च करणारे लोक गुंतवणूक मोठ्या प्रमाणात करतात, स्वतःचा वर्तमान आणि भविष्य सुरक्षित करू शकतात. आर्थिक सुरक्षितता हि मानसिक आणि शारीरिक सुरक्षिततेची हमी देऊ शकते. पैसे असणारा माणूस आर्थिक सुरक्षितता अनुभवतो, पर्यायाने तणावमुक्त, आरोग्यसंपन्न आणि आनंदी जीवन जगू शकतो.  पारंपरिक आर्थिक दृष्टिकोनाच्या पाठीवर आर्थिक मानसशास्त्राचा तर्कसंगत, आनंदायक आणि सुरक्षित  दृष्टिकोन निर्माण केला जात आहे. तर्कसंगत व्यक्ती आपल्या बचतीचा व खर्चाचा प्राधान्यक्रम वर्तमान आणि भविष्यातील गरजा, संभाव्य अडचणी, स्वतःच्या अपेक्षा, आनंद आणि सुरक्षितता यांचा सारासार विचार करून ठरवीत असतो.
       दीर्घकालिक आर्थिक ध्येये गाठण्यासाठी  स्व-नियंत्रण फार महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत व्यक्तीने आपल्या स्वतःच्या अपेक्षा, आवेग, भावना, अभिरुची आणि गरजांवर नियंत्रण प्राप्त करणे अत्यावश्यक असते. स्वतःला नियंत्रित करणारी व्यक्ती  कोणतीही असाध्य गोष्ट साध्य करू शकते. परंतु लोकांमध्ये बोधनिक क्षमता मर्यादित असते, त्यामुळे त्यांच्या अवाक्यातील गोष्टी देखील ते प्राप्त करण्यात असर्मथ ठरतात. बोधनिक क्षमता मर्यादित असल्यामुळे विचारांचा विस्तार झालेला नसतो. दीर्घकालिक आर्थिक ध्येय गाठण्यासाठी आजूबाजूला असंख्य पर्याय उपलब्ध असतात, पण मर्यादीत विचारांमुळे तिथपर्यंत ते पोहचू शकत नाहीत. लोक बऱ्याचदा अशा पर्यायांची निवड करतात जे त्यांच्या आवडीत संमिश्रीत संबंध ठेवतात. असा विकल्प निवडायला हवा जो आपल्याला दीर्घकालिक आनंद आणि आर्थिक लाभ देणारा असला पाहिजे. आर्थिक मानसशास्त्र हे लोकांच्या आर्थिक प्रगतीमधील मानसिक आणि भावनिक अडथडयांना दूर करून अधिक निरोगी आणि आनंदी वर्तनासाठी लोकांना मार्गदर्शन करण्याचे काम करते.

                                                                                                                                                 



Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..