पुस्तक परिचय
स्व शोधाचा सकारात्मक मानसशास्त्राचा नवा दृष्टिकोन प्रा. नागोराव डोंगरे मानसशास्त्र विभाग प्रमुख, एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर जि धुळे spdmdept.ofpsychology@gmail.com ‘समृद्ध जीवनाचे मानसशास्त्र’ हा कॅप्टन प्रा. शशिकांत खलाणे लिखित ग्रंथ अलीकडेच धुळे येथे प्रकाशित झाला. या ग्रंथाचे लेखक कॅप्टन प्रा. खलाणे हे मानसशास्त्र विषयातील ज्येष्ठ व अनुभवी प्राध्यापक आहेत. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या त्रिसूत्रीचा सखोल आणि प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. राष्ट्रीय छात्र सेना (NCC) या संघटनेचा कार्यभारही त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयात समर्थपणे पार पाडला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी त्यांचा सुसंवाद आणि स्नेहसंबंध दृढ झालेले असून, अनेक विद्यार्थी त्यांच्या सान्निध्यात मार्गदर्शन घेत असतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांची जाण त्यांच्याकडे असल्यानेच या ग्रंथाची निर्मिती केली गेली आहे, असे दिसून येते. या ग्रंथाचे वाचन करताना त्यांच्या विद्वत्तेचा आणि अनुभवसंपन्नतेचा प्रत्यय पदोपदी येतो. या ग्रंथाला उपयोजित मानसश...