पुस्तक परिचय

 स्व शोधाचा सकारात्मक मानसशास्त्राचा नवा दृष्टिकोन 

प्रा. नागोराव डोंगरे 

मानसशास्त्र विभाग प्रमुख, 

एस. पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर जि धुळे 

       spdmdept.ofpsychology@gmail.com

‘समृद्ध जीवनाचे मानसशास्त्र’ हा कॅप्टन प्रा. शशिकांत खलाणे लिखित ग्रंथ अलीकडेच धुळे येथे प्रकाशित झाला. या ग्रंथाचे लेखक कॅप्टन प्रा. खलाणे हे मानसशास्त्र विषयातील ज्येष्ठ व अनुभवी प्राध्यापक आहेत. अध्ययन, अध्यापन आणि संशोधन या त्रिसूत्रीचा सखोल आणि प्रदीर्घ अनुभव त्यांना आहे. राष्ट्रीय छात्र सेना (NCC) या संघटनेचा कार्यभारही त्यांच्या कुशल नेतृत्वाखाली महाविद्यालयात समर्थपणे पार पाडला जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांशी त्यांचा सुसंवाद आणि स्नेहसंबंध दृढ झालेले असून, अनेक विद्यार्थी त्यांच्या सान्निध्यात मार्गदर्शन घेत असतात. विद्यार्थ्यांना येणाऱ्या विविध समस्यांची जाण त्यांच्याकडे असल्यानेच या ग्रंथाची निर्मिती केली गेली आहे, असे दिसून येते. 


या ग्रंथाचे वाचन करताना त्यांच्या विद्वत्तेचा आणि अनुभवसंपन्नतेचा प्रत्यय पदोपदी येतो. या ग्रंथाला उपयोजित मानसशास्त्र विभाग, मुंबई विद्यापीठ मुंबई येथील सेवानिवृत्त प्राध्यापक व विभागप्रमुख डॉ. चंद्रशेखर देशपांडे यांची प्रस्तावना लाभली आहे. सिग्मंड फ्राईड यांचे ‘मनोविकृती प्रारुप’ हे सकारात्मक मानसशास्त्राच्या निर्मितीमुळे मानसशास्त्राला त्यागावे लागले, असा उल्लेख देशपांडे सर प्रस्तावनेत करतात. तसेच ते, फ्रॉईड यांनी मानसिक विकृती आणि त्यांच्या उपचारांवर विशेष भर दिला; मात्र माणसांमधील जन्मजात सामर्थ्ये आणि सदगुण याकडे त्यांनी तुलनेने दुर्लक्ष केल्याचा आरोपही ते करताना दिसतात. एकूण सकारात्मक मानसशास्त्र का आणि किती महत्वाचे आहे? यामागील भूमिका विशेद करण्याचे काम या ग्रंथाची प्रस्तावना करीत असल्याचे वाचकाच्या लक्षात येते. 


संपूर्ण ग्रंथ पाच विभाग आणि पंधरा प्रकरणात सामावलेला आहे. भाग पहिला वाचकांना सकारात्मक मानसशास्त्राची ओळख करून देतो. सकारात्मक मानसशास्त्राकडे भारतीय अभ्यासक आणि पाश्चात्य अभ्यासक कसे भिन्न दृष्टीने पाहतात, हे समजून सांगण्याचा प्रयत्न लेखक पहिल्या भागात करताना दिसतो. “आनंद ही बाहेरून मिळणारी तयार गोष्ट नसून, तो आपल्या स्वतःच्या कृतीच्या निवडी आणि वर्तनातून निर्माण होतो” हे दलाई लामा यांचे वचन उद्धृत करून लेखक इथे भारतीय दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न करतो. आधुनिक पाश्चात्य दृष्टिकोनानुसार आनंद हा वैयक्तिक स्वातंत्र्य, भौतिक समृद्धी, मानसिक समाधान आणि आत्मसिद्धी यावर आधारलेला असल्याचे लेखक मांडतो. वेगळ्या शब्दात सांगायचे झाल्यास भारतीय दृष्टिकोन हा त्यागावर भर देतो, तर पाश्चात्य दृष्टिकोन हा भोगावर भर देणारा आहे. थोडक्यात पाश्चात्य दृष्टिकोन हा भौतिक सुविधा, माणसाच्या शारीरिक, मानसिक आणि भावनिक गरजांची पूर्तता, मानवी स्वातंत्र्य यावरून आनंदी जीवनाचा शोध घेतो; भारतीय दृष्टिकोन हा वरील गोष्टींसोबत ज्ञान, शील, शांती, सदाचार, मध्यम मार्ग आणि ध्यान धारणा या मुद्द्यांच्या आधारे आनंदी जीवनाचा शोध घेतो. लेखक ही सांस्कृतिक तफावत मांडण्याचा प्रयास या भागात करताना दिसतो. भारतीय मानसशास्त्राचे स्त्रोत म्हणून वेद, उपनिषदे, स्मृती, पुराणे, महाभारत यांचा संदर्भ लेखक देतो. तसेच भगवान बुद्धांनी सांगितलेले ‘चार आर्यसत्य’, ‘आर्य अष्टांगिक मार्ग’ आणि ‘विपश्यना ध्यान’ आणि भगवान महावीर जैन यांनी सांगितलेली अहिंसा, कर्म, संस्कार आणि कर्मफल सिद्धांत यासारख्या बाबींची मांडणी भारतीय मानसशास्त्राच्या परंपरेत लेखक करतो. 


ग्रंथाचा दुसरा भाग हा आनंदाचा अर्थ, आनंदाचे मापन, व्यक्तिनिष्ठ सुस्थिती, जीवनातील विविध घटना आणि त्या मधील आनंद, अस्सल आनंद, ‘PERMA’ प्रारूप यासारख्या मुद्द्यांभोवती फिरतो. या भागातील पहिल्या प्रकरणात लेखक जागतिक आनंद निर्देशकांची (World Happiness Index) चर्चा करतो. त्यात हा निर्देशांक कोणत्या निकषांच्या आधारे मोजला जातो, लेखक ते निकष मांडताना दिसतो. जीवन समाधान हा मानवी आनंदाशी संबंधित असलेला एक महत्त्वाचा घटक आहे. त्यावर विश्लेषण करताना लेखक म्हणतो की, “जीवन समाधान म्हणजे व्यक्तीला आपल्या जीवनाबद्दल जाणवलेली समाधानाची पातळी होय. जीवन समाधान हे वैयक्तिक अनुभव, अपेक्षा आणि यशांवर आधारित असते. एखादी व्यक्ती आपल्या उद्दिष्टांची पूर्तता, नातेसंबंध, आरोग्य, नोकरी किंवा जीवनातील इतर पैलूंवर समाधानी असेल, तर ती उच्च जीवन समाधान अनुभवते”, असे तो सांगतो. तसेच आपण आपल्या आनंदाचे सर्वंकश मापन कसे करू शकतो, याविषयी ‘PANAS’, ‘Subjective Happiness Scale’ यासारख्या मानसशास्त्रीय चाचण्यांचे सविस्तर वर्णन देखील येथे केले गेले आहे. बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था ह्या विविध अवस्थेतील मानवी आनंदाचे स्वरूप, स्त्रोत आणि त्याचे प्रमाण हे भिन्न असणे साहजिक आहे. त्याविषयीचे विस्तृत विवेचन वाचकाला या भागात वाचायला मिळते. एवढे नव्हे तर स्त्रिया आणि पुरुष आपला आनंद भिन्न पद्धतीने का अनुभवतात, या संबंधीची चर्चा याच भागात केलेली मिळते. तसेच सुस्थिती आणि संपूर्ण मानसिक आरोग्य म्हणजे नेमके काय याची माहिती देखील इथे सविस्तर दिलेली आहे. लेखक इथवरच थांबले नाहीत तर आपण जीवन आनंद कसा वाढविला पाहिजे, यासाठीचे काही उपाय सुद्धा ते वाचकाना देताना दिसतात. 


तिसरा भाग सकारात्मक भावना आणि त्यांचा जीवन संवर्धनासाठी होणारा उपयोग यावर केंद्रित झाला आहे. “सकारात्मक भावना ह्या मानवाच्या भरभराटीसाठी मूलभूत अनुभव आहेत, यात आनंद, कृतज्ञता, आशा, उत्सुकता आणि प्रेरणा यांचा समावेश होतो” ही सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ मार्टिन सेलिग्मन यांची व्याख्या अधोरेखित करून सकारात्मक भावना ह्या नेमक्या काय आहेत, हे समजवण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला आहे. माणूस जेव्हा सकारात्मक भावनांचा अनुभव घेऊ लागतो, तेव्हा तो नोकरी किंवा व्यवसाय करताना अगदी तल्लीन होऊ करू लागतो. उदा. एखादी व्यक्ती शिक्षक असेल, तर तो त्याच्या अध्ययन, अध्यापनात नवनवीन प्रयोग करू लागतो. नवीन गोष्टी शिकू लागतो, जुन्या गोष्टी परत नव्या पद्धतीने करून पाहतो, वर्गात प्रत्येक दिवशी तयारी करून प्रवेश करतो, शिकवताना स्वतःला आणि विद्यार्थ्यांना आनंद देऊ लागतो. आता वर्गात शिकवताना पूर्वीपेक्षा वेळ अपुरा पडू लागतो. कारण तो कामात इतका तल्लीन होतो, एकरूप होतो की आपला एक तास कधी व कसा संपला हे त्याला कळत सुद्धा नाही. अशा अनुभवाना प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ सिक्सझेंट मिहाली हे ‘प्रवाही अनुभव’ (Flow Experience) म्हणतात. थोडक्यात तो त्याच्या व्यावसायिक जीवनात पूर्ण क्षमता पणाला लावून काम करू लागतो, व्यावसायिक भरभराट किंवा यश अनुभवू लागतो. त्या सकारात्मक भावनांचा परिणाम नातेसंबंध, शारीरिक व मानसिक आरोग्य, आर्थिक प्रगती ह्या सारख्या सर्वच क्षेत्रात अनुभवास येऊ लागतो, तेव्हा भावनिक समृद्धी प्राप्त होते. ही भावनिक समृद्धी व्यस्त जीवन, अर्थपूर्ण जीवन आणि समृद्ध जीवनाचा पाया कशी बनते, याचे सुंदर आणि मर्मग्राही विवेचन लेखक ‘PERMA’ प्रारुपात करताना दिसतो. सशक्त भावना कृतीत रूपांतरित होत असतात. हे सिद्ध करण्यासाठी तो “जर तुमच्या भावना नियंत्रणात असतील, आत्म जागरुकता नसेल आणि तुम्हाला नकारात्मक भावनांचे व्यवस्थापन करता येत नसेल, तर तुम्ही कितीही बुद्धिमान असलात तरी फार पुढे जाऊ शकत नाही” हे प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॅनियल गोलमन यांचे अवतरण देऊन उत्तमरित्या सिद्ध करतो. 


चौथा भाग हा स्थितीस्थापकत्व, वैयक्तिक ध्येय, स्व-नियमन आणि स्वनियंत्रण तसेच सकारात्मक गुणविशेष आणि समाजोपयोगी वर्तन याच्याशी निगडित आहे. जीवन म्हटलं की त्यामध्ये चढ-उतार, आजारपण, संकटे, अपघात हे ओघाने येणारच आहेत. काही संकटे स्वतःहून येतात तर काही आपल्या चुकीच्या वर्तनामुळे येत असतात. संकटे कसेही असोत ते आपला प्रगतीचा वेग, संधी आणि आनंद हिरावून घेतात. संकटामधून मार्ग काढण्याची क्षमता ही प्रत्येक माणसाच्या ठायी असते. पण काही लोक तिचा उत्तमरीत्या वापर करतात तर काही लोक ते करू शकत नाहीत. कारण त्यांचा स्वतःवरती विश्वासच नसतो. म्हणून “प्रतिकूल परिस्थितीत पुन्हा उभे राहण्याची, संकटांचा आत्मविश्वासाने सामना करण्याची आणि आघातांमधून सकारात्मक बदल करण्याची क्षमता म्हणजे स्थितिस्थापकत्व होय” ही सुंदर व्याख्या लेखकाने येथे केली आहे. या संकल्पनेचा विस्तार करताना तो स्थितिस्थापकत्वाचे प्रकार, स्थितिस्थापकत्व कौशल्याचे प्रमुख स्तंभ, स्थितिस्थापकत्व कौशल्य आणि स्थितिस्थापकत्वाचे स्रोत समर्पकपणे मांडताना दिसतो. स्पर्धात्मक जगाचा विचार करता वैयक्तिक ध्येय, स्व-नियमन आणि स्व-नियंत्रण हे प्रकरण अतिशय लोकाभिमुख असे झाले आहे. तसेच सकारात्मक गुणविशेष हे प्रकरण सुद्धा अतिशय वाचकांसाठी उपयुक्त असे आहे. जसा माणूस स्वतःचे वैयक्तिक ध्येय प्राप्त झाल्याने आनंदी होतो; तसाच तो जेव्हा इतर लोकांना मदत करतो, त्याने देखील तो आनंदी होत असतो. इतरांना मदत करण्याच्या वर्तनाला सकारात्मक मानसशास्त्रात ‘समाजोपयोगी वर्तन’ म्हणतात. त्याच्या मुळाशी परोपकार, करुणा, तदनुभूती, कृतज्ञता आणि क्षमाशीलता हे महत्त्वपूर्ण गुण असल्याचे लेखक मांडतो. 


ग्रंथाचा पाचवा भाग मन-सजगता, प्रवाह-स्थिती, अध्यात्मिकता, जीवनाचा उद्देश व अर्थ तसेच समृद्ध जीवनासाठी आवश्यक सकारात्मक पर्यावरणनिर्मिती या घटकांभोवती केंद्रित झालेला आहे. माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे. तो क्षणाक्षणाला बदलत असतो. हे बदल शरीर आणि विचारांच्या पातळीवरती सुरू असतात. या बदलांकडे लक्ष देण्याला सकारात्मक मानसशास्त्रात ‘मन-सजगता’ किंवा ‘वर्तमानात जगणे’ म्हणतात. हातातून निघून गेलेला भूतकाळ पुन्हा जगू शकत नाही आणि भविष्यकाळ माणसापासून लांब असल्यामुळे त्यात देखील तो जगू शकत नाही. त्याच्या हाती असतो केवळ आणि केवळ तो म्हणजे वर्तमान काळ. तो जितक्या सजगतेने माणूस जगेल तितका तो यश आणि आनंद प्राप्त करू शकतो. कारण लेखक सांगतो की, “जीवनातील प्रत्येक क्षण हा नाविन्यता आणि शक्यता यांनी भरलेला असतो”. परंतु माणूस सजग नसल्याने वर्तमानातील नाविन्यता व शक्यता त्याला दिसत नाहीत. म्हणून प्रत्येक क्षणी माणसाने स्वतःकडे निरीक्षकाच्या भूमिकेतून तटस्थपणे बघायला हवं. याविषयीची सविस्तर माहिती या मुद्द्यात लेखकाने स्पष्ट केली आहे. त्याचप्रमाणे विक्टर फ्रँकल यांच्या ‘लोगो थेरपी’वरील विश्लेषण सुद्धा या भागात वाचायला मिळते. फ्रँकल यांच्या मते, “मनुष्य हा केवळ शरीर व मन एवढाच नसून त्याच्याकडे एक आध्यात्मिक परिमाण देखील असते. शरीर आणि मन आजारी पडू शकते, मात्र शुद्ध चैतन्य कधीच आजारी पडत नाही”. याचे भान प्रत्येक माणसाला असल्यास तो कोणत्याही संकटाला किंवा दुःखाला धैर्याने सामोरे जाऊ शकतो. हा संघर्ष अनेकदा संपूर्ण आयुष्याला अर्थपूर्णता प्राप्त करून देतो. जीवनाला अर्थ केवळ वैयक्तिक सुखभोगातून मिळत नाही. अशी चिंतनात्मक चर्चा लेखक येथे करताना दिसतो. जीवनाची सुस्थिती ही फक्त व्यक्तीच्या मनःस्थिवर अवलंबून नसून ती कुटुंब, शाळा, कार्यस्थळ, समुदाय आणि समाज यासारख्या संस्थांमधील परिस्थिती व पर्यावरणावरून ठरत असते. सकारात्मक पर्यावरणात व्यक्तीचे सदगुण वाढतात, आकाराला येतात तर नकारात्मक पर्यावरणात ते कुंठित होतात. म्हणून समृद्ध जीवनाच्या प्रवासात व्यक्तीसोबतच त्याच्या सभोवतीचे वातावरण महत्वपूर्ण भूमिका पार पाडते. एका बाजूला भौतिक सुविधा, माहिती तंत्रज्ञान, यासारख्या सुखसोयी प्रचंड वेगाने वाढत आहेत. पण त्या तुलनेत माणूस जेवढा सुखी, समाधानी आणि आनंदी व्हायला हवा, तेवढा तो होताना दिसत नाही. म्हणून समृद्ध जीवनाचे स्वप्न साकार करण्यासाठी सामाजिक पर्यावरणात सकारात्मक विचारांची रुजवण करणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी सकारात्मक पालकत्व, शाळा आणि सकारात्मक शिक्षण, सकारात्मक आरोग्य विकसित करणे गरजेचे असल्याचे मत लेखक मांडतो. 


या ग्रंथाचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक प्रकरणाची सुरुवात छोट्या -छोट्या बोध कथांनी होते. त्यामुळे क्लिष्ट असणाऱ्या मानसशास्त्रीय संकल्पना वाचकाला सहज समजतात, वाचकांची उत्कंठा वाढविण्यात मदत करतात. लेखकाने मानसशास्त्रीय संकल्पनांसोबत संबंधित मानसशास्त्रज्ञांचा थोडक्यात परिचय दिल्यामुळे हा ग्रंथ अधिक आशयसंपन्न झाला आहे. ग्रंथाची मांडणी पाच विभागात आणि पंधरा प्रकरणात केली गेली. प्रत्येक विभागातील प्रकरणांची शीर्षके त्या त्या विभागांच्या मुख्य शीर्षकांसोबत सुसंगत असल्याचे आढळते. काही ठिकाणी मुद्दे व आशयाची पुनरावृत्ती वाटत असली, तरीही ती त्या प्रकरणाची गरज म्हणून झालेली आहे. ग्रंथाची भाषाशैली संपूर्णतः जरी सामान्य नसली तरीही ती मानसशास्त्रीय परिभाषेपासून पुरेसे अंतर जोपासते. त्यामुळे ती सामान्य वाचक आणि मानसशास्त्रीय अभ्यासक दोघांनाही आपलीशी वाटते. लेखनाचा फॉन्ट सुद्धा आकर्षक असून वाचकाला सहसा त्रासदायक ठरत नाही. ग्रंथाचे मुखपृष्ठ आकर्षक व आशयसूचक असे आहे. मलपृष्ठावर डॉ. यश वेलणकर यांचा अभिप्राय पाठराखण म्हणून घेतला असता तर खूप छान झाले असते. पण तरीही ब्लर्ब म्हणून ग्रंथाचा सारांश दिल्याने वाचकांना आकर्षित करण्यासाठी अधिक सोयीचे झाले आहे. प्राचार्य डॉ. हिम्मतराव नरके, मनोविकारतज्ञ डॉ. दिलीप महाजन आणि सेवानिवृत्त प्राचार्य सोपान बोराटे सर यांचे अभिप्राय देखील उत्तम वाचनीय असे आहेत. प्रत्येक प्रकरणात आवश्यक तेथे सुसंगत तक्ते, चित्रे, प्रसिद्ध सुवचने दिल्याने लिखाण अधिक रंजक आणि उत्कंठावर्धक झालेले आहे, ज्यामुळे वाचकाला अधिक खोलात जाण्याची इच्छा होते. प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी मुख्य मानसशास्त्रीय संकल्पना स्पष्ट करुन सामान्य वाचकाला आशयसंपन्न करण्याची संधी लेखकाने साधली आहे. प्रकरणाच्या शेवटी वाचकाला नोंदी करण्यासाठी पुरेशी जागा देण्यात आली आहे, या जागेचा उपयोग वाचकांनी सजगतेने केल्यास या ग्रंथातील संकल्पना दैनंदिन जीवनात प्रत्यक्ष अनुभवण्यास मिळू शकतात आणि खऱ्या अर्थाने समृद्ध जीवनाची सुरुवात होईल, अशी आशा वाटते. 


अंतिमतः असे सांगावेसे वाटते की, आनंदी आणि अर्थपूर्ण जीवनाकडे वाटचाल करण्यासाठी ‘समृद्ध जीवनाचे मानसशास्त्र‘ हा ग्रंथ कमालीचा यशस्वी झाला आहे. परिशिष्ट व संदर्भसूची यासह ४१५ पानात सामावलेला हा ग्रंथ वाचकाच्या मनाचा ठाव घेतो. मराठीत केलेलं हे लिखाण अधिक सोपे व सहज झालेले असल्याने त्यातून भारतीय ज्ञान परंपरा अधिक समृद्ध होईल यात कोणताही संशय नाही. 





Comments

Popular posts from this blog

FYBA SEM-II PSY-121 Cognitive Process

सकारात्मकतेकडून आनंदाकडे

मानसशास्त्राच्या शाखा किंवा क्षेत्रे