लॉकडाऊन मधील गरीबांची पायपीट
आपला गावसोडून शहराकडे जाणारी माणसं आज खूप पश्चाताप करू लागली. कोणी शेतीवाडीत काम मिळत नव्हतं म्हणून शहरात गेली. गावातल्या मजुरीपेक्षा शहरात चार पैसा जास्त मिळतो म्हणून काहीनी आपली घरं सोडली. काहीनी सावकाराचं बक्कळ कर्ज फेडायचं म्हणून गावातली घरं ओस पाडली. काहीजण तर " शहरात हाताला मिळेल ती मोलमजुरी करू, पण गावातली सालं-महिने भरणं आता नको रं बाबा" असं म्हणत शहरवासी झाली. गावातल्या शाळेत मुख्याध्यापक असेल तर वर्गशिक्षक नसतो. मुख्याध्यापक सुट्टीवर गेला की वर्गशिक्षक मोबाईलमध्ये गुंग. शिक्षणाच्या नावानं नुसती बोंबाबोंब. शहरात पोरांना चांगलं शिक्षण तरी मिळेल, म्हणून काहीनी गाव पोरका केला. अर्थात गावात देखील काही शिक्षक अजूनही छान काम करीत आहेत. स्वतःमधला शिक्षक त्यांनी मोठ्या मेहनतीनं जपला आहे. असेच सर्व शिक्षक काम करू लागली, तर आज सुद्धा खाजगी शाळांपेक्षा सरकारी शाळांना चांगले दिवस येतील. गमावलेला विश्वास परत मिळविता येईल. पण आज जे जे सरकारी आहे, ते ते उपयोगाचं नाही, असा समज जवळपास सगळीकडे पसरला. त्याला गरीब लोक तरी कसा अपवाद असतील. पण कोरोनाच्या लढाईत सरकारी हॉस्पिटल मोठया परिश्रमाने लढत आहेत, हे न विसरता येणारं सत्य आहे. असो काहींकडं वडिलोपार्जित दोन-तीन एक्कर शेती, धड विकता येईना अन धड वाहता पण येईना. काही महाभाग तर शेती मक्त्यानं देण्यासाठीच वर्षातून एखाद्यावेळी गावाचं तोंड पाहतात. काही मंडळी गावातल्या जाती व्यवस्थेची, राजकारणाची शिकार झाली म्हणून शहराकडे आकर्षित झाली. शहरातलं थोडसं आधुनिक जीवन जगण्यासाठी गावाला पोरकी झाली. हंगामी मजूर चिमुकल्या पोरांना गावात आपल्या म्हाताऱ्या-म्हातारीच्या माथी मारून, दोन पैसा कमवायला गेलेली. पण आज हि सारी माणसं कोरोना महामारीनं फार चिंतीत आहेत. दररोज पायपीट करून आपला गाव जवळ करीत आहेत.
गावातली शेती, नातीगोती हेच आपलं खरं रक्षण करू शकतील, असा विश्वास या लोकांना वाटू लागला. भले शेतात मोलमजुरी करू, चार पैसे कमी मिळाले तरीही चालतील, पण आता गावाशिवाय आपला तरणोपाय नाही, असं या लोकांना वाटू लागलं आहे. म्हणून कोणतेही वाहन नसताना पाचशे, सातशे, हजार, दिडहजार किलोमीटरचा रस्ता पायीपायी पार करू लागली. मुलाबाळांना आपल्या खांद्यावर घेऊन रणरणत्या उन्हात हि पायपिट मुंग्यांच्या धारेसारखी प्रत्येक रस्त्यावरून जाताना दिसत आहे. रस्त्यात मिळेल ते खायचं, दुपारच्या उन्हात रस्त्यातलं एखादं मोठं झाड विश्रांतीसाठी आपलंसं करायचं. उन्हापासून रक्षण करण्यासाठी बहुतेक लोक दुपारी झोपतात आणि रात्रीची पायपिट करीत आपलं घर जवळ करीत आहेत.
पहिला लॉकडाऊन १४ एप्रिल पर्यंत संपून जाईल आणि मग आपला गावाला जाण्याचा मार्ग मोकळा होईल, अशी आशा या लोकांना होती. या कालावधीत मा. पंतप्रधान, प्रत्येक राज्याचे मुख्यमंत्री यांनी केलेल्या सूचनांचे त्यांनी काटेकोरपणे पालन केले. मोठया आनंदानं टाळ्या आणि ताटल्या वाजविल्या. कोरोना महामारीनं लोक मरत असताना सुद्धा मोठया उत्साहाने दिवे लावून दिवाळी साजरी केली. जेव्हा मा. पंतप्रधानांनी दुसरा लॉकडाऊन घोषित केला, तेव्हा मात्र या लोकांच्या मनाचा बांध फुटला. लोक रस्त्यावर उतरू लागली, आवाज उठवू लागली. काही ठिकाणी निदर्शने करू लागली, ते कसे हालाकीचे जीवन जगात आहेत, त्याचे व्हिडीओ बनवून शेअर करू लागली. आपल्या मागण्या नातेवाईक, स्थानिक प्रशासन, सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींकडे पाठवू लागली. खरं तर सोशल मिडीयाच्या माध्यमातून ह्या लोकांना एक हक्काचं स्टेज मिळालं. तेव्हा सरकारी उपाययोजना अगदी खोलवर सुरु झाल्या. लेबर रजिस्ट्रेशन मध्ये किती लोकांचे नाव रजिस्ट्रर झालं, याचा शोध काही टीव्ही चॅनलवाल्यानी घेण्याचा प्रयत्न केला. परंतु हाती काही फारसं चांगलं मिळू शकलं नाही. सरकारकडून रेशन असेल, काही आर्थिक मदत असेल, निराधार लोकांच्या खात्यात जमा होणारा पगार असेल, अशा सोयीसुविधा असताना देखील लोक आपल्या गावाचा रस्ता पकडू लागली.
यावरून भूक हि माणसाची एकमेव गरज नाही, हे सिद्ध होत आहे. भुकेसोबत माणसाला असंख्य गरजा असतात. या पायपिटीत काही लोकांना चांगले-वाईट अनुभव आले. अन्नदान करणाऱ्या लोकांनी गरीबांना भरभरून मदत केली. परंतु काही ठिकाणी अन्नदान करताना गरीब लोकांचा आत्मसन्मान दुखावला गेला. काही ठिकाणी भोजन देताना दान करणारी लोक फोटो काढत होती. काही गरीब लोकांनी आम्हाला जेवन वाटप करताना फोटो काढण्यास विरोध केला. "आम्ही मजबुरी म्हणून तुमची मदत घेत आहोत, आम्ही भिकारी नाही आहोत", असे वाद देखील झालेत. काही ठिकाणी अक्षय्य तृतीयेनिमित्त लोकांना जेवनात पुरणपोळ्या देखील देण्यात आल्या. थोडक्यात, भोजन वाटपासोबतच भावना देखील जपण्यात आल्या. घर सोडून पायपिट करणाऱ्या लोकांना पोरकेपणा, एकाकीपणा वाटू नये, हि उदात्त भावना त्यामागे होती. हिच खरी माणुसकी आहे, जातीपाती पलीकडे जाणारा हाच खरा मानवता धर्म आहे.
गावातून शहरात गेलेल्या काही लोकांनी ह्या कोरोनाच्या काळात आपला व्यवसाय बदलून घेतला. मोल मजुरी करणारे काही लोक आता फेरी मारून भाजीपाला विकताना दिसत आहेत. काही रिक्षावाल्यानी भाजीपाला, फळे रिक्षातून विकायला सुरुवात केली. शिवण काम करणाऱ्या महिलांनी मास्क तयार करण्याचं काम हाती घेतलं. काही उद्योग समूहांनी देखील आपले पारंपारीक उत्पादन सोडून सॅनेटाइजर, पिपीई स्किट बनवायला सुरुवात केली. कोणत्याही संकट काळात जी लोक स्वतःला शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या हवं तसं वाकवू शकतात, तेच लोक संकट काळात देखील टिकून राहतात. या ठिकाणी संत तुकाराम महाराज यांच्या ह्या दोन ओळींची मला आठवतात.
महापुरा जाती झाडे
तेथे लव्हाळे वाचती|| जगतगुरु तुकोबाराय
जे लोक शारीरिक, मानसिक लवचिकता स्विकारतात, असे लोक कोणत्याही संकटात आपल्या स्वतःला बदलू शकतात आणि मार्ग काढून पुढे जातात. नवीन गोष्टी शिकतात, नवीन कौशल्ये शिकतात, आपला व्यवसाय बदलतात, जुन्याच व्यवसायाचे नवीन कंगोरे शोधून काढतात आणि स्वतःला सिद्ध करतात. पायपिट करीत गावाला जाणारे लोक आपल्या स्वतःला नव्याने सिद्ध करण्यासाठी गावाकडे निघाली आहेत.
काहीच्या गाठी थोडा पैसा आहे. पण रस्त्यातली सगळी हॉटेल बंद असल्यानं काही विकत घेऊ शकत नाहीत. कोरोना महामारीनं निर्माण झालेली अनिश्चतता इच्छा असून सुद्धा काही खर्च करण्यास मन धजत नाही. आज खिश्यात असलेला पैसा शेतात पेरणीसाठी,पोटभरण्यासाठी,पोराबाळांच्या आजारपणासाठी वापरता येईल, असा विचार मनोमनी घुटमळतो आहे. काहींजवळ तर काहीच नाही, गावात काहीतरी करू पण निश्चित जीव वाचवू, अशी त्यांची मनोदेवता त्यांना धीर देत आहे. या लॉकडाऊनच्या काळात लोकांचा पुन्हा आपल्या गावातल्या लोकांवर, शेतांवर विश्वास बसू लागला आहे. आज प्रगतीपेक्षा जीवन सुरक्षित असणं अधिक महत्वाचं वाटू लागलं आहे. सर सलामत तो पगडी पचास, हि म्हण जणू सर्वांचं ब्रीद वाक्य बनली आहे.
त्यातील काही लोक चालता- चालता आपल्या अर्धवट शिक्षण सोडलेल्या मुलांना सल्ला देताना दिसत होती. "मद्यम वर्गातले लोक बघ, कसे आपल्या घरात सुरक्षित आहेत", हे मुलांना समजावून सांगत होती. "तू जर चांगला शिकला असता, नोकरीला लागला असता, तर आपल्या जीवांची अशी ओढाताण झाली नसती", शिक्षण कसं महत्वाचं आहे, हे त्यांच्या मनावर बिंबवीताना दिसत होती. आता गावाला जाऊन अर्धवट शिक्षण पूर्ण कसं करायचं याचं गणित मांडत होती.
काही लोकांपुढे गावातलं मोडकं घर दुरुस्त कसं करायचं हा प्रश्न होता. काहींच्या डोळ्यांपुढे बिमार आई-वडीलांची चित्रं तरंगत होती. त्यांचे गावात आजारानं कसे हाल होत आहेत, ते गप्पांच्या ओघात एकमेकांना सांगत होती. मनावरचं ओझं कमी करताना दिसत गोती. प्रत्येकजण माझी समस्या कशी मोठी हेच सांगण्याचा प्रयत्न करीत होता. काही पायपिट करणारे लोक गावात अडकलेल्या मुलांना फोनवरून आम्ही कुठे पोहचलो आहे, घरी पोहचण्यासाठी आणखी किती दिवस लागतील ते सांगत होती. मुलांना फोनवरून धीर देत होती. काही लोक सरकारवर संताप करीत होती. आम्हाला आमच्या गावाला जाऊ द्यायला पाहिजे होतं, मग हे लॉकडाऊन सुरु करायला हवं होतं, सरकारच्या नियोजनातील उणिवा दाखवीत होती. कोणी लोक रस्त्यात लोकांनी खाण्या-पिण्याची कशी मदत केली, याविषयी भरभरून बोलत होती. समाजात माणुसकी अजून कशी जिवंत आहे, हे पुन्हा पुन्हा सांगत होती.
Comments
Post a Comment