सकारात्मकतेकडून आनंदाकडे डॉ. नागोराव डोंगरे, मानसशास्त्र विभाग,एस.पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे मानसशास्त्र हे माणसाच्या वर्तनाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. आपल्या वर्तनाने इतरांना दुःख होणार नाही, सर्वांचे हित साधले जाईल, ज्यात आपलं देखील हित समाविष्ट असेल, अशा वर्तनाला आपणास सकारात्मक वर्तन म्हणता येईल. परंतु जेव्हा काय सकारात्मक आणि काय नकारात्मक हे ठरवायचं असतं, तेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थी प्रवृतीं, आपल्या पारंपारिक धार्मिक श्रद्धा, सामाजिक चालीरीती आणि आपले वैयक्तिक पूर्वग्रह यानुसार आपण ते ठरवीतो. त्यामुळे निश्चितच सकारात्मकता आणि नकारात्मकता यांच्या संकुचित व्याख्या तयार होऊ शकतात. संकुचित व्याख्या कोणत्याही शास्त्रात उचित ठरणार नाहीत. तशाच त्या मानसशास्त्राला देखील योग्य ठरणार नाहीत. माणसाकडून होणारे कोणतेही वर्तन जे इतराना त्रासदायक ठरणारे, इतरांचा आनंद हिरावून घेणारे, त्यांची सुखशांती घालविणारे, समाजात दुही माजविणारे, विसंवाद निर्माण करणारे, इतरांसोबत स्वतःचा आनंद कमी करणारे वर्तन सकारात्मक वर्तन होऊ...