लॉकडाऊन आणि सकारात्मकता

 लॉकडाऊन आणि सकारात्मकता




      संपूर्ण जगात कमी अधिक प्रमाणात सगळीकडे लॉकडाऊन सुरु आहे. कोरोना महामारीतून सुटका करण्याचा एक हमखास उपाय म्हणून संपूर्ण जग लॉकडाऊन कडे बघत आहे. कोणतीही गोष्ट जेव्हा आपण स्वतःहून स्विकारतो किंवा निवडतो तेव्हा ती आपल्याला निश्चत आनंद देणारी असते. पण जेव्हा एखादी गोष्ट आपली मानसिक तयारी नसताना लादली जाते, तेव्हा ती मात्र त्रासदायक वाटण्याची अधिक शक्यता असते. लॉकडाऊन आपल्या सुरक्षेसाठी जरी असला तरीही आपली मानसिक तयारी नसताना लादलेला खबरदारीचा एक उपाय आहे. ज्यात आपल्याला घरात राहूनच कोरोना महामारीला संपवायचं आहे. तिचा जगभर होणारा फैलाव रोखायचा आहे. आपल्या घरात राहून वारंवार हात धुणं, सॅनेटाईज करणं, घराबाहेर पडल्यावर सुरक्षित अंतर ठेऊन वागणं हि खबरदारी सर्वांनी घेणं आवश्यक आहे. आपल्यापैकी बहुतेक लोक दररोज हि काळजी घेत असतीलच, परंतु काहींकडून हलगर्जीपणा जर झाला तर आपल्या सर्वांना त्याचे परिणाम भोगावे लागणार आहेत. "मला जसं वाटेल तसं मी वागेन" हे व्यक्ती स्वातंत्र्य जपण्याची हि वेळ नाही. आपण एकमेकांशी जोडलेले आहोत. म्हणून स्वतःची काळजी घेणं म्हणजे इतरांची काळजी घेण्यासारखं आहे. माणसानं माणसाशी माणसासारखं वागण्यातच सकारात्मकता दडलेली आहे. माणसानं आपलं जीवन आरोग्यसंपन्न, हसत-खेळत, नितिमत्तापूर्ण आणि प्रगतिशीलपणे जगणं म्हणजे 'सकारात्मक जीवन' जगणं म्हणता येईल. लॉकडाऊन दरम्यान आपल्याला स्वतःसाठी आणि घरातल्या इतर लोकांसाठी सकारात्मक कसं जगता येईल, हा खरा प्रश्न आहे. लॉकडाउनच्या काळात आपली लढाई दुहेरी झाली आहे. एका बाजूला जगात पसरणारी कोरोना महामारी आहे, तर दुसऱ्या बाजूला घरात बसून वाढलेल्या मानसिक समस्या आहेत. आपलं सगळ्यांचं लक्ष मोबाईल, टिव्हीवरील कोरोना रुग्णांच्या वाढत्या आकड्यांवर, मृत्यू झालेल्या लोकांच्या संख्यांवर, पोलिस-डॉक्टर आणि सरकार यांच्या कार्यांवर आहे. पण घरात बायको का चिडचिड करीत आहे? लहान  मुलं  का धुसफूसत आहेत? आपण स्वतः आजारी नसताना थकल्यासारखं का वाटतं? हसतं-खेळतं घर अचानक शांत कसं? काहीसे किरकोळ पण रोजच्या जगण्याशी निगडित असणारे प्रश्न ह्याकडे आपलं लक्ष आहे का? हे प्रश्न आपल्या जगण्यातल्या सकारात्मकतेला हात घालतात. पालक म्हणून आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतात. जे मानसिक समस्यांचा सामना करीत आहेत ते इतके सुज्ञ नाहीत, जे सुज्ञ आहेत त्यांना हा  मानसिक कोंडमारा नीटपणे हाताळता येत नाही, म्हणून घरातला कर्ता म्हणून आपणच हि परिस्थिती हाताळायला हवी. सर्व गोष्टी बाजूला सारून स्वतःचा आणि  घरातल्या लोकांचा आनंद परत आणण्यासाठी प्रयत्नांची परकष्ठा करायला हवी.
     आज बहुतेक घरात लहान-मोठे लोक मोबाईल फोनवर लॉकडाऊनचा वेळ घालवीत असतील. अर्थातच, ऑनलाईन क्लास, ऑनलाईन ऑफिसची कामे, आपल्या प्रगतीत वाढ करणाऱ्या गोष्टी करीत असाल तर उत्तमच आहे. पण नुसत्या इकडच्या पोष्ट तिकडे शेअर करण्यात व्यर्थ वेळ घालवित असाल तर हे वर्तन मानसिक आरोग्याला आणि प्रगतीला पोषक नाही. त्यापेक्षा मोबाईलचा वापर सकारात्मकपणे करू शकता. आपल्या व्यावसायिक क्षमता वाढवू शकता, नवीन तंत्रज्ञानाचा आपल्या व्यवसायात उपयोग कसा करायचा हे शिकू शकता. त्यासाठी पालकांना आपल्या स्वतःच्या भूमिका बदलाव्या लागल्या तरी काही हरकत नाही. किमान लॉकडाऊन पुरतं तरी स्वतःच्या मुलाचं शिष्यत्व पालकांनी पत्करायला काय हरकत आहे? त्यानं आपला स्वत :चा इगो देखील कमी होईल आणि मुलांमध्ये आत्मविश्वास देखील निर्माण करता येईल. आज मोबाईलवर वाचन करतांना डोळ्यांना खूप त्रास होतो, तेव्हा ऑडिओ- व्हिडीओ बुक आपण स्वतः आणि आपल्या घरातल्या लोकांना ऐकवू शकतो. ऑनलाईन अशा भरपूर गोष्टी आहेत, ज्या आपल्या ज्ञानात आणि कौशल्यात भर घालू शकतात. ह्या गोष्टी आपल्या स्वतःच्या आणि आपल्या घरातील लोकांच्या भावी जीवनात सकारात्मकपणे भूमिका पार पाडू शकतात. आपलं ज्ञान आणि कौशल्यात मोलाची भर घालू शकतात. आपला भूतकाळ अभिमानास्पद,सध्याचा वर्तमान आनंदी, आणि येणारा भविष्यकाळ देखील आनंदी बनवू शकतात.
       घरातल्या छोटया मुलांना आपले गल्लीतले मित्र खेळायला हवे असतात. ते कधी पालकांजवळ गल्लीत, मित्रांच्या घरी जाण्यासाठी हट्ट धरीत असतील. त्यांना कसं समजावून सांगावं हा अनेक पालकांचा प्रश्न आहे. आज  नात्यांमध्ये काहीसा संशय आणि भिती निर्माण झालेली बघावयास मिळते. त्यामुळे शेजारी-पाजारी देखील स्वतःच्या मुलांना दुसऱ्यांच्या घरी खेळायला जाऊ देत नाहीत आणि गल्लीतल्या इतर मुलांना घरात प्रवेश देत नाही. काही छोट्या बाळांच्या आयांना कोरोनाची लागण झाल्यामुळे त्यांना घरात किंवा हॉस्पिटल मध्ये कॉरंटाईन करण्यात आले असेल. अशा मुलांची आईला भेटण्याची इच्छा असेल, ह्या चिमुकल्यांना समजून सांगितलं तर समजेल का? ह्या पालकांना मोठी तारेवरची कसरत करावी लागत असेल नाही का? अशावेळी घरातील जाणते लोक मुलांच्या शारीरिक गरजा तर पूर्ण करू शकतात, पण मानसिक गरजा तशाच अपूर्णच राहतात. ह्या परिस्थिती पालकांनी त्यांच्याशी सतत गप्पा मारणं, अगदी छोटं होऊन खेळणं, त्याच्या संपूर्ण शारीरिक गरजा पूर्ण करणं अपेक्षित आहे. आपल्या गप्पांचा अर्थ छोट्यांना समजतोचं असं नाही, पण ते आपल्या हावभावांचं वाचन करीत असतात. खरं तर देहबोली हि युनिव्हर्सल भाषा आहे. छोटी मुलं आपल्या हवभावांचं निरीक्षण करून अर्थबोधन करु शकत असतील. म्हणूनच कदाचित अनोळखी व्यक्ती दिसल्यास ते रडायला सुरुवात करीत असावीत. यापेक्षा मोठ्या वयोगातील मुलांसोबत पालकांनी खेळणं, एख्याद्या पुस्तकाचे सामूहिक वाचन करणं, कथा कथन करणं, एखादा चित्रपट घरातील संपूर्ण लोकांसोबत पाहणं, त्यावर चर्चा करणं, चर्चेत मोठ्यांसोबत छोट्यांना देखील सहभागी करून घेणं महत्वाचं आहे. मुलांसोबत खेळतांना अगदी कागदी विमानं बनवून घरातल्या घरात उडवायला आणि आपलं बालपण मुलांसोबत अनुभवायला मोठ्यांची काही हरकत नसावी. बैठे खेळ वाघ-बकरी, कॅरम, लपाक्षेपी वगैरे खेळून त्यांचं मनोरंजन करावं.
      लॉकडाऊनचा कालावधी मुलांच्या सुप्तगुणांना विकसित करण्यासाठी अत्यंत उपयुक्त कालावधी आहे. ज्याला गाणं येत असेल त्याला गाणं गाण्यास सांगायचं आणि घरातील सगळ्यांनी टाळ्यांची दाद द्यायची. घरात सगळ्यांनी एकत्र येऊन कोणाला काही वाद्य वाजविता येत असेल, तर त्याला वादन करायला सांगून सगळ्यांनी मनमुराद आनंद घ्यायला हवा. अभिनय करणाऱ्या मुलांकडून छोट्या नाटिका बसवायला हव्यात. दुपारी थोडा विश्रान्तीचा तास देखील ठेवायला हवा. आराम झाल्यावर माणसाचं मन प्रसन्न होतं.
      छोट्या-मोठ्या लोकांनी ह्या लॉकडाऊनचा उपयोग आपले छंद जोपासण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला पाहिजे. बहुदा कामांचा व्याप, शिक्षण, व्यावसायिक जबाबदाऱ्यामुळे छंद जोपासणं जमत नसतं. तेव्हा हि फार छान सुवर्ण संधी आहे, तिचा पूर्णपणे उपयोग करून घेतला पाहिजे. छंद अशी गोष्ट आहे, ती पुन्हा पुन्हा करून पाहायला मजा येते. छंदात माणूस आपल्या स्वतःला शोधत असतो. अर्थात जगणं देखील दुसरं-तिसरं काही नसून स्वत:चा  शोधच असते. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर माणसाला स्वतःला सिद्ध करावं लागतं. छंदात सुद्धा सर्वोच्च पातळी गाठताना तो 'आत्मवास्तविकीकरण' करीत असतो. छंदात एखादा अभिनय करणारा कलाकार आपल्या 'आदर्श स्व' चा 'शोध घेण्यासाठी पुन्हा पुन्हा रिटेक घेतो. एखादा चित्रकार मनासारखे चित्र जोपर्यंत तो काढू शकत नाही, तोपर्यंत तो अनेक कागदांवर तल्लीन होऊन पुन्हा पुन्हा चित्र काढीत राहतो. छंदात माणूस आपलं सर्वस्व विसरून जातो, ती सर्वोच्च अवस्था प्राप्त करता आल्यास त्याला जो आनंद होतो, तो जगातल्या कोणत्याही गोष्टीत मिळू शकत नाही. छंद माणसाला सक्रिय राहण्यास, नेहमी नाविन्याचा ध्यास घेणास भाग पाडतात, त्यामुळे माणसात नवनिर्माण करण्याची प्रेरणा कार्यरत राहते. कलागुण माणसाचं व्यक्तिमत्व समृद्ध करून सोडतात, स्वतःला आनंदी आणि इतरांना देखील आपल्या अविष्कारांनी आनंदी बनवीत असतात.
      लॉकडाऊनच्या काळात आपल्या स्वतःचं आणि घरातल्या सगळ्यांचं मानसिक, शारीरिक आरोग्य जपण्याची आवश्यकता आहे. मी मुद्दामहून मानसिक, शारीरिक आरोग्य असा उलटक्रम घेतला आहे. कारण आपण अद्यापही जेवढी शारीरिक आरोग्याची काळजी घेतो, तेवढी मानसिक आरोग्याची घेत नाही. परंतु मन आणि शरीर हे परस्परांशी निगडित आहेत. किंबहुना, शरीरापेक्षाही मन अतिशय महत्वाचं आहे. जर का आपण शरीराला गाडीची उपमा दिली तर मनाला ड्रायव्हरची उपमा द्यावी लागेल. भलेही गाडी ड्रायव्हरला जगभर फिरवीत असेल, पण जोपर्यंत ड्रायव्हर तिला पूर्व दिशेला वळवीत नाही तोपर्यंत ती वळत नाही. अगदी तसंच नातं आपल्या शरीर आणि मनाचं आहे.  कारण जोपर्यंत एखादी गोष्ट आपण मनानं पक्की करीत नाही, तोपर्यंत ती आपल्या प्रत्यक्ष कृतीत उतरत नाही. आपण पाहतो डोळ्यांनी पण काय बघायचं आणि काय नाही बघायचं ते आपलं मन ठरवीत असतं. आपण चालतो पायानं पण कोणत्या दिशेनं आणि किती चालायचं हे आपलं मन ठरवित असतं. आपण ऐकतो कानाने पण काय आणि कोणाचं ऐकायचं हे मन ठरवीत असतं. बोलतो तोंडाने पण किती आणि कसं बोलायचं हे मनच ठरवीत असतं. म्हणून आपलं मन सशक्त करायला हवं. सशक्त शरीरासोबत सशक्त मन असेल तर माणूस कोणतीही लढाई जिंकू शकतो. आपल्यामधील 'स्व' किंवा 'मी' चा संबंध शरीरापेक्षा मनाच्या अधिक जवळ जाणारा आहे. तोच आपला वर्तन प्रपंच चालवीत असतो, असं म्हणायला हरकत नाही. मानवी मनाविषयी भगवान गौत्तम बुद्ध देखील असं म्हणतात की, मनाला शुद्ध करण्याच्या विज्ञेने  (विपश्यना ध्यानसाधना) कामवासना, दृष्ट बुद्धी, आळस, चिंता आणि संशय ह्या पाच गोष्टीं नष्ट होतात आणि तर्क, विचार, प्रेम, सुख आणि मनाची एकाग्रता ह्या पाच गोष्टी शिल्लक राहतात. ह्या पाच गोष्टींमद्ये आपल्या आनंदीची बिजे दडलेली आहेत. आनंदी जीवन जगायचे असेल तर आपल्या शारीरिक आरोग्यासोबतच मानसिक आरोग्याची देखील काळजी घेणं खूप आवश्यक आहे. मनाची काळजी घेण्यासाठी आपल्या क्षमतेनुसार ध्यान करा, योगाभ्यास करा, प्राणायाम करा. वाचन करा, वाचनासारखा मनाचा दुसरा कोणताही व्यायाम नाही. वाचन करणारा माणूस घरात बसून जगाची सफर करीत असतो. चौफेर वाचनातून माणसाच्या विचारांना नवीन विचारांचे अंकुर उगवतात, हे अंकुरच माणसाला नकारात्मक विचारांकडे झुकू देत नाहीत. वाचन करणारा माणूस विचारांनी शांत, संयमी आणि चिंतनशील बनतो. चिंतनातून लेखन करू लागतो, भाषण करू लागतो, आपल्या संग्रही असलेलं ज्ञान इतरांसोबत शेअर करतो. स्वतःला विवेकी आणि इतरांना देखील विवेकी बनविण्यासाठी प्रयत्नशील असतो.
      लॉकडाऊनचा उपयोग सकारात्मक पद्धतीनं करा, स्वतः आनंदी रहा आपल्या कुटुंबाला, मित्रांना आनंदी आणि सर्जनशील बनविण्यासाठी प्रयत्नशील रहा. काही लोक आपल्या स्वतःची काळजी घेणारे असतात,पण इतरांची काळजी घेत नाहीत. काही लोक इतरांची काळजी घेतात पण स्वतःची काळजी घेत नाहीत. काही बेफिकीर लोक स्वतःची आणि इतरांची देखील काळजी घेत नाहीत. काही लोक स्वतःची देखील काळजी घेतात आणि इतरांची देखील काळजी घेत असतात. ह्या चार प्रकारात विभागले गेलेल्या लोकांमध्ये स्वतःची आणि इतरांची काळजी घेणारे लोक सर्वश्रेष्ठ आणि सकारात्मक म्हणायला हवीत. लॉकडाऊनच्या काळात स्वतःची काळजी घ्या आणि इतरांची देखील काळजी घ्या. घरात आणि घराबाहेर सकारात्मकपणे वागा, स्वतः आनंदी रहा आणि इतरांना आनंदी राहण्यास मदत करा. प्रत्येक माणसानं असं सकारात्मक वर्तन केल्यास निश्चितच स्वतःसोबत इतरांचं जीवन देखील समृद्ध होण्यासाठी मदत कराल. स्वतःच आपलं आत्मनिरीक्षण करा आणि आपण कोणत्या लोकांमध्ये बसतो हे ज्याचं त्यानंच ठरवावं.  



आपला
प्रा.नागोराव शालीग्राम डोंगरे
मानसशास्त्र विभाग प्रमुख
एस. पी.डी.एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे

                                                                                                               


                                                                                                             




    

Comments

  1. बहुत बडीयांं सर ़ मुझे इस लेख से यह सिख मिली की हमे वाहन चालक की भाथी अपने मन को काबू मे रखना चाहीए । अपने लक्ष को हासिल करना चाहीए।

    ReplyDelete
    Replies
    1. जी हा शुद्ध, शांत और संयमी मन हि आपण काम सफल करानेमें मदत करता है, और अशुद्ध, अशांत, क्रोधीत मन आपण काम बिघाड शकता है.

      Delete
  2. सकारात्मक विचार ही काळाची गरज आहे सर.आजच्या युवा पिढीला नकारात्मक विचारांपासून सकारात्मक विचाराकडे घेऊन जाण्यास आपला लेख निश्चितच उपयुक्त ठरेल यात शंका नाही. असेच प्रेरणा दायक लेखांसाठी सुभेच्छा डॉ. डोंगरे सर........

    ReplyDelete
    Replies
    1. होय खरं माझा स्वतःचा आनंद आणि तरुण लोकांना मला काही शाश्वत गोष्टी सांगायच्या आहेत. म्हणून मी लिहितो आहे, जीवनाची सकारात्मक बाजू मी त्यांच्यापुढे ठेवण्याचा प्रयत्न करतोय. प्रत्येक छोटा-मोठा माणूस सकारात्मक असतो. परंतु काहींचा आपल्यामधील साकारात्मक विचार आणि गुणांपेक्षा नकारात्मक विचारांवर अधिक फोकस असतो. मला तो फोकस नकारात्मतेकडून सकारात्मक विचारांकडे वळवायचा आहे. मी माझ्या अनुभवातुन सांगतोय जो माणूस आपल्या स्वतःकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्यास शिकला की तो सभोवतालच्या आपोआपच बघायला लागेल. त्याला पावलोपावली प्रगतीच्या संधी सापडू लागतील

      Delete
  3. दादा आज पूर्ण लेख वाचला खरच खूप छान आणि वास्तवाला धरून लिहलेला लेख आहे आणि सध्या याची गरज सर्वानाच आहे
    धन्यवाद

    ReplyDelete
    Replies

    1. धन्यवाद ताई तुमच्या प्रतिक्रिया मला प्रेरणा देतात...

      Delete
  4. धन्यवाद

    आपली प्रतिक्रिया माझ्यासाठीप्रेरणादायी आहे.

    ReplyDelete
  5. डोंगरे सर नमस्कार,
    लॉक डाऊन च्या काळातील सकारात्मकता या लेखात सकारात्मक मानसशास्त्राच्या विविध संकल्पनांचा आधार घेत अभ्यासपूर्ण लेख लिहिला . लेखात लहान-मोठे या सर्वांचा मानसिक आरोग्याचा विचार केला असून सर्वांना उपयुक्त मार्गदर्शनही केले आहे. सकारात्मक मानसशात्राच्या अंगाने लेख लिहून सकारात्मक मानसशास्त्राची उपयुक्तता पटवून दिली त्याबद्दल मनापासून अभिनंदन.

    ReplyDelete
    Replies
    1. आदरणीय खलाने सर
      आपली प्रतिक्रिया माझ्यासाठी नुसती प्रतिक्रिया नाही, तर पाठीवर दिलेली शाबासकीची थाप आहे. आपल्या ह्या थापेने मला बळ मिळालं आहे. आणखी लेखन करण्यासाठी माझा आत्मविश्वास वाढविला आहे. सर माझी आपणास विनंती कौतुकांसोबत थोडी आलोचना जर करण्यात आली तर बरे होईल. कोणत्याही लेखनकर्त्याची लेखणी टिका-टिप्पणीतुन अधिक धारदार बनते. पुनः आपले मनापासून धन्यवाद !!
      आपला
      नागोराव डोंगरे

      Delete
  6. छान, अगदी महत्वपूर्ण

    ReplyDelete
  7. चिंतन ,मनन करुण वास्तविक परिस्थिती अतिशय सुन्दर शब्दात मंडली सर.

    ReplyDelete
  8. डोगरे सर आपला लेख वास्तवला धरुन आहे सध्या अश्या लेखनाची समाज्याला गरजेचाआहे,

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती