सकारात्मक गुण
सकारात्मक गुण
कोणत्याही माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या अंगी असणाऱ्या गुण-दोषांचं संमिश्रण असतं. अगदी महापुरुष देखील याला अपवाद नसतात. प्रत्येकाच्या अंगी जसे गुण असतात तसेच काही दोष देखील असतात. हे नाकारता येणार नाही. काही लोकांमध्ये गुणाचं प्रमाण अधिक असतं तर काहींमध्ये दोदोषांचं प्रमाण अधिक असतं. एक गोष्ट मात्र निश्चित आहे, ती म्हणजे लोकांचं व्यक्तिमत्व त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांनी उठून दिसतं, तर काही लोक आपल्या दोषांमुळे लोकांमध्ये प्रसिद्ध होतात. कोणी सकारात्मक गुणांनी प्रसिद्ध व्हायचं की नकारात्मक गुणांनी व्हायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. परंतु माणसाची ओळख समाजात निर्माण करण्यात त्याच्या अंगी असलेले गुणदोष अत्यंत महत्वाची भूमिका पार पडतात, ही काळ्या गडावरील रेष आहे.
माणसाच्या स्वतःवर आणि त्याच्या अवती-भोवती असणाऱ्या परिस्थितीवर सकारात्मक प्रभाव पाडणाऱ्या गुणांना सद्गुण अथवा सकारात्मक गुण म्हणता येईल. ज्या गुणांमुळे व्यक्ती स्वतः आनंदी बनतो आणि इतरांना देखील आनंदी करतो. सकारात्मक गुण माणसाला वेगळ्या उंचीवर नेतात. व्यक्तिला स्वतःला आणि त्याच्या सहवासात राहणाऱ्या लोकांना आनंदी बनवितात. सकारात्मक गुणांनी संपन्न लोकांचा सहवास प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. त्याचा प्रसन्न चेहरा, बोलण्यातला गोडवा, वागण्यातली विनम्रता, व्यहारामधील प्रामाणिकपणा लोकांना आकर्षित करतो. असे सकारात्मक गुण प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वात असतात. परंतु काही लोकांना त्याची जाणीव असते तर काही त्याविषयी स्वतःच अजाण असतात. व्यक्तिमत्व मानसशास्त्रज्ञ काही मानसशास्त्रीय चाचण्यांचा वापर करून लोकांच्या अंगी असलेले गुणदोष शोधून देण्याचं काम करतात. एवढेच नव्हे तर माणसांमधील सकारात्मक गुणांचा विकास व्हावा आणि नकारात्मक गुण कमी करण्यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेतात. शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देऊन लोकांचा व्यक्तिमत्व विकास साधतात.
प्रत्येक व्यवसाय यशस्वीपणे करण्यासाठी काही विशिष्ट गुणांची आवश्यकता असते. माणसांमधील गुणदोष त्याचे व्यावसायिक यश-अपयश निश्चित करतात. त्यामुळे माणसांमधील गुणदोषाला विशेष महत्व आहे. एखादा सदगुणी माणूस दोन नंबरची कामे करण्यात अपयशी होण्याची शक्यता अधिक असेल. कारण त्या व्यवसायात तेच लोक काम करू शकतात जे आक्रमक, हिंसक, खोटारडे , अफरातफरी करणाऱ्या प्रवृत्तीची असतात. आपल्या व्यक्तिमत्त्वातील गुणदोषांना साजेसा व्यवसाय जर आपण निवडला असेल तर त्यात लवकर यशस्वी होण्याची शक्यता अधिक असते. कारण त्या व्यवसायाला लागणारे सर्व गुण आपल्या व्यक्तिमत्वात असतात आणि काही गुण जरी आपल्या जवळ नसले तरी ते शिकण्याची आपली मानसिक तयारी असते. माणसाच्या व्यक्तिमत्त्वातील गुणदोष हे त्याची विचार प्रक्रिया, जीवनाविषयीचे तत्वज्ञान, अभिरुची, गरजा, सवयी आणि परिस्थिती यांचा परिपाक असतो.
सकारात्मक गुण लोकांना त्यांच्याकडे आकर्षित करतात. जेव्हा कोणीतरी हसऱ्या चेहऱ्याची, उदार दयाळू , अभ्यासू, गोड आवाजात बोलणारी आणि अतिशय विनम्र व्यक्ती दिसल्यास वेगळ्या प्रकारची ऊर्जा जाणवते. लोभस व्यक्तिमत्व आपणास भारावून टाकते.
वैयक्तिक सकारात्मक गुण असंख्य सांगता येतील. उदा . दयाळू, कोमल, विचाराने ठाम, कठोर परिश्रम, विश्वासु, प्रामाणिक, जबाबदार, व्यवहारीक, तंदुरुस्त, सर्जनशील, अष्टपैलू आणि संवेदनशील असे अनेक सकारात्मक गुण सापडतील. यादी करावयाची झाल्यास खूप मोठी यादी निर्माण होईल. आता आपण काही महत्वपूर्ण सकारात्मक गुणांची चर्चा करणार आहोत.
काही महत्वाचे सकारात्मक गुण :
१) कृतज्ञता: माणसाला जीवनात अनेक लोकांची मदत मिळालेली असते. आपल्या पूर्वजांनी बऱ्याच गोष्टी आपल्यासाठी करून ठेवलेल्या असतात. त्यामुळे आपले जीवन फार व्यवस्थित आणि सुसह्य झालेलं असतं . आपल्या कर्तृत्वाच्या उड्या त्यांच्या पूर्वकर्मांवर अवलंबून असतात. अर्थात याची जाणिव आपल्याला असायला हवी. आज मी जो काही आहे, त्यासाठी अनेकांनी परिश्रम घेतले आहेत, त्यांच्यासाठी मी काही केलं पाहिजे, हिच ती जाणिव म्हणजे कृतज्ञता होय. साधं जेवणाचं उदाहरण जरी घेतलं तरी लक्षात येईल की, जेवणाला कोणाकोणाचे हात लागले. शेतकरी, शेतमजूर, व्यापारी, दुकानदार, हमाल, निवडणारी बाई, गिरणीवाला, स्वयंपाकी बाई, ताटात जेवण वाढणारी आई नंतर आपण असतो. थोडक्यात आजचं आपलं आनंदी जीवन हे नुसतं आपलं एकट्याचं नाही. त्यामागे असंख्य लोक आहेत. मुलाला आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना कसं विसरता येईल? शिक्षकांना कसं विसरता येईल? ज्यांनी आपणास वेळोवेळी मदत केली अशा हितचिंतकांना, मित्रांना, नातेवाईकांना विसरून विजयाचे पेढे कसे वाटू शकतो ? लक्षात घेण्याची गोष्ट म्हणजे शरीर-मन किंवा एक जीव म्हणून जरी आपण स्वतंत्र असलो, तरी एक माणूस म्हणून स्वतंत्र नाहीत. आपल्यातलं माणूसपण वगळूनच स्वार्थी प्रवृत्तीचं समर्थन केलं जाऊ शकतं. म्हणून आपण ह्या सर्व लोकांचं, निसर्गाचं, समाजाचं कृतज्ञ असलं पाहिजे. अन्यथा आपल्यातलं माणूसपण संपण्याचा धोका असतो.
कृतज्ञता म्हणजे नुसते धन्यवादाचे पोकळ शब्द नव्हेत, तर कृतज्ञता म्हणजे माणसाच्या मनातली भलेपणाची जाणिव आहे. कुणीतरी एखाद्या गरीब, बेवारस मुलाला सांभाळत, लहानाचं मोठं करतं, चांगलं शिक्षण देतं, गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळतं, अशा मुलाचं त्या लोकांच्या प्रति जबाबदारीन वागणं म्हणजे कृतज्ञता आहे. कृतज्ञता धन्यवादासोबत नातं निर्माण करायला शिकवीते, अस्तित्वात असलेलं नातं आणखी घट्ट करायला शिकविते. ज्यांचे आपल्यावर आशिर्वाद आहेत अशांच्या प्रति विनम्र होऊन उतराई होण्यास भाग पाडते. कृतज्ञता मानसिक ताणाचं ओझं वाढवित नाही जबाबदारीचा आनंद वाढविते. हाच आनंद कृतज्ञ व्यक्ती आणि आशिर्वाद देणारी व्यक्ती अशा दोघांच्या चेहऱ्यावर आनंदचं हसू बहरण्यास भाग पाडतं. दोघांचं मानसिक आरोग्य उत्तम राहतं आणि जीवनात आनंदाचा वर्षाव होतो.
क्रमशः
क्रमशः
Comments
Post a Comment