सकारात्मकतेकडून आनंदाकडे

सकारात्मकतेकडून आनंदाकडे

डॉ. नागोराव डोंगरे,
मानसशास्त्र विभाग,एस.पी. डी. एम. महाविद्यालय, शिरपूर, जि. धुळे 
मानसशास्त्र हे माणसाच्या वर्तनाचं अभ्यास करणारं शास्त्र आहे. आपल्या वर्तनाने इतरांना दुःख  होणार नाही, सर्वांचे हित साधले जाईल, ज्यात आपलं देखील हित समाविष्ट असेल, अशा वर्तनाला आपणास सकारात्मक वर्तन म्हणता येईल. परंतु जेव्हा काय सकारात्मक आणि काय नकारात्मक हे ठरवायचं असतं, तेव्हा आपण स्वतःच्या स्वार्थी प्रवृतीं, आपल्या पारंपारिक धार्मिक श्रद्धा, सामाजिक चालीरीती आणि आपले वैयक्तिक पूर्वग्रह यानुसार आपण ते  ठरवीतो.  त्यामुळे निश्चितच सकारात्मकता आणि नकारात्मकता यांच्या संकुचित व्याख्या तयार होऊ शकतात. संकुचित व्याख्या कोणत्याही शास्त्रात उचित ठरणार नाहीत. तशाच त्या मानसशास्त्राला देखील योग्य ठरणार नाहीत. माणसाकडून होणारे कोणतेही वर्तन जे इतराना त्रासदायक ठरणारे, इतरांचा आनंद हिरावून घेणारे, त्यांची सुखशांती घालविणारे, समाजात दुही माजविणारे, विसंवाद निर्माण करणारे, इतरांसोबत स्वतःचा आनंद कमी करणारे वर्तन सकारात्मक वर्तन होऊ शकणार नाही. सकारात्मक वर्तनाला जातीपाती, धर्म आणि देश यांच्या सिमा बंदिस्थ करू शकत नाहीत. सकारात्मक वर्तन हे जात-पात, धर्म, वंश, लिंग, रंग  आणि गरीब-श्रीमंती यापलीकडे जाणारे वर्तन आहे. ते सार्वकालिक, सर्वभौम असुन त्यात निश्चित सर्वांचे हित व सर्वांचा आनंद सामावलेला आहे.
  ज्यांना  जीवनात आनंद मिळवायचा आहे, त्यांनी सकारात्मक वर्तनापासून सुरवात करायला हवी. आनंदाची पहिली पायरी सकारात्मक वर्तन आहे. सकारात्मक वर्तनाशिवाय आनंदाची प्राप्ती म्हणजे नुसते स्वप्न ठरू शकेल. म्हणून इतरांना त्रासदायक ठरतील अशा गोष्टींपासून आपण लांब राहिले पाहिजे; स्वतः व इतरांना आनंद देणाऱ्या गोष्टी आपण आत्मसात केल्या पाहिजे. त्याशिवाय आनंदाच्या प्रवासात आपली प्रगती होऊ शकणार नाही. सकारात्मक वर्तन हि शाश्वत आनंदाची पूर्वअट आहे. येथे शाश्वत आनंद हि संकल्पना भौतिक आनंदाच्या (पद, पैसा, प्रतिष्ठा आणि लैंगिक वासना) पलीकडे जाणारी जाणारी आहे. हे आपण समजून घ्यायला हवं. भांडण, खून, चोरी, बलत्कार, फसवणूक आणि इतरांचा अपमान करून खरच आपण आनंदी होणार आहोत काय? ह्या गोष्टी करताना आपल्या मनाची सुखशांती, प्रसन्नता अबाधित ठेऊन करता येतील का? ह्या गोष्टी आपल्याला अल्पकालिक आनंदासाठी दुःखाच्या दीर्घकालिक दरीत ढकलणाऱ्या आहेत. अशा वर्तनांमुळे आपला भूतकाळ व वर्तमानकाळ दुखदायी झाला असणार आणि भविष्यकाळ देखील दुःखी होण्याची शक्यता आहे. कारण, नकारात्मक वर्तनातून आपल्या मनात चिंता, भिती, संशय, अस्वस्थता ह्या नकारात्मक भावना जन्म घेतात; तर सकारात्मक वर्तनातून सुखशांती, आनंद, प्रसन्नता, विश्वास, आत्मविश्वास, प्रेम, सहकार्य अशा सकारात्मक भावना निर्माण होतात. सकारात्मक भावना आपला आनंदी वर्तमान अधिक आनंदी बनवितात, तसेच भविष्यातील आनंदाचे  बिजारोपण देखील करतात. थोडक्यात, स्वर्ग आणि नरक बघण्यासाठी मरण्याची गरज नाही. दैनंदिन जीवनात स्वतः सुखशांतीचा अनुभव घेणं ह्यापेक्षा स्वर्गसुख वेगळं नाही. आपल्या सहवासात इतर लोकांना सुखशांती व प्रगतीचा अनुभव येण, हे खरं स्वर्गसुखच नाही का? यावरून सकारात्मक वर्तन हे आपला आनंद वाढविते आणि इतरांचा देखील आनंद वाढवित असते.  सकारात्मक वर्तन समजायला जरी सोपं असलं, तरी रोजच्या जीवनात अंमलात आणणे थोडं अवघड काम आहे, परंतु अशक्य मात्र मुळीच नाही. दैनंदिन जीवनातील सकारात्मक वर्तनाचे विविध आयाम जरा विस्तारानं समजून घेतले पाहिजे.
     इतरांशी सकारात्मक संवाद साधणे आनंदायी आहे. माणसाचं बोलणं नेहमी शुद्ध, विनम्र, आदरयुक्त आणि सर्वहिताचं असायला हवं. शुद्धी ही अशुद्धता दूर करूनच प्राप्त करता येते. म्हणून बोलण्यातील अशुद्धता म्हणजे नेमकं काय? हे आपण सर्वप्रथम समजून घेऊ. बहुदा आपल्यापैकी बरेच लोक शुद्ध बोलण्याचा अर्थ व्याक्रणात्मक शुद्धी असा घेतील. संवादात व्याकरण शुद्धी असायलाच  हवी; पण त्यासोबतच खोटं बोलणं, बोभाट बोलणं, निंदानालस्ती करणं, कोणाची तरी बदनामी करणं, अर्थहीन गप्पागोष्टी करणं, एखादी गोष्ट चढवून सांगणं, एखादी गोष्ट वजा करून सांगणं देखील बोलण्यातला अशुद्धपणाच आहे. असा संवाद हा त्रिकालबाधित सकारात्मक संवाद होऊ शकत नाही; तर चक्क स्वतःशी आणि इतरांशी केलेला विसंवाद ठरतो. बोलण्यामधील अशुद्धता मनाची सुखशांती घालविल्याशिवाय बोलताच येत नाही. बोलताना अशुद्धतेची (अयोग्य) जाणीव देखील आपल्याला होते, पण तिचा अनादर करून आपण ते बोलत असतो. इतरांची मन:शांती भंग होईल असे बोलू नये, बोलताना शिव्या सारख्या कठोर शब्दांचा उपयोग करू नये. संवादातील अशुद्धता स्वतःची आणि इतरांची हानी करीत असतो. आनंदाकडे जाण्याचा पहिला मार्ग म्हणजे सकारात्मक संवाद आहे, असं म्हणायला हरकत नसावी. पावसाचं पाणी जसं जमिनीचा तळ शोधत झिरपते; अगदी त्याच प्रमाणे सकारात्मक संवाद देखील आनंदाचा तळ शोधात जनसमुहात झिरपतो.
     शुद्ध आणि सत्य बोलणारा माणूस लोकांमध्ये विश्वास संपादन करतो. तो जे पाहिले आहे, जे ऐकले आहे, तेच बोलतो. इकडची गोष्ट तिकडे सांगुन लोकांमध्ये फूट, गैरसमज, विसंवाद, संशय निर्माण करीत  नाही. आपल्या शब्दांचा उपयोग भांडणाऱ्यांना समजविण्यासाठी, भांडण सोडविण्यासाठी, त्यांनी मिळून-मिसळून राहण्यासाठी, आणि एकता निर्माण करण्यासाठी करतो. तो इतका गोडं बोलतो कि ऐकणाऱ्या लोकांना प्रिय, रसरसीत, सभ्य, लोकांना रुचकर आणि हवेहवेसे बोलतो. जे लोकांना पुन्हा पुन्हा ऐकायला आनंद वाटतो. त्याचं बोलणं प्रासंगिक, सार्थकी, शिस्तप्रिय, मनाला जोडणारं, लक्षात राहील असं, व्यवहारयुक्त, आटोपशीर आणि परिणामकारक असतं. असा सकारात्मक संवाद सर्वांना आनंद देतो, सुखसमाधान देतो आणि प्रगतीची संधी उपलब्ध करीत असंतो.
     सकारात्मक कृती सर्वांसाठी आनंदायी आहेत. सकारात्मक कृती समजून घेण्यासाठी अगोदर नकारात्मक कृती कोणत्या आहेत? हे समजून घेतले पाहिजे. नकारात्मक कृतींमध्ये प्राण्याची हत्या करणं, इतरांच्या वस्तू न विचारता वापरणे किंवा चोरून घेणं, घरात पत्नी असताना परस्त्रीशी शरीरसंबंध ठेवणं, नशिले पदार्थ जसे दारू, गांजा यांचे सेवन करणे. ज्यामुळे माणसाची शुद्ध (बोध) हरविली जाते, आपण काय बोलत आहोत, काय करीत आहोत याचा फारसा बोध होत नाही. ह्या चार  गोष्टी नकारात्मक कृती आहेत; तर बाकी सर्व गोष्टी सकारात्मक कृती आहेत. ह्या गोष्टी काही काळासाठी आनंददायक वाटू शकतात; परंतु त्रिकालबाधित आनंदी ठरू शकत नाहीत. कारण नकारात्मक कृती चिंता, भिती, संशय, अस्वस्थता ह्या भावना जन्माला घालतात. ह्या नकारात्मक भावना ज्या गृहस्थाचा पाठलाग करीत असतील तो माणूस आनंदी कसा असेल? नकारात्मक कृती करताना  ह्या गोष्टी वाईट आहेत, आपली हानी करणाऱ्या आहेत, याची जाणीव आपणास होते. परंतु त्याला न जुमानता आपण वाईट गोष्टींच्या मागे स्वतःचा पैसा खर्च करून पळत असतो. बहुधा काही दारू घेणारे लोक आम्ही आनंदासाठी दारू पितो असं समर्थन करतील. पण तो काही क्षणांचा आनंद शाश्वत आनंद असतो काय?  त्या मधून भावी आनंदाचे बीजारोपण होते काय? काय तो आनंद सर्वहिताय आहे? असा आनंद घेतांना आपल्या मनाची सुखशांती अबाधित असुच शकत नाही. काय असा आनंद आपल्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्याला पोषक आहे? आपल्या मनाची सुखशांती धोक्यात घालून आनंद कसा घेता येईल? म्हणून जे लोक भ्रष्ट, गुन्हेगार असतात, अशाना रात्री नशापान केल्याशिवाय किंवा झोपेच्या गोळ्या घेतल्याशिवाय सुखकारक झोप लागत नसावी.
      आपल्याकडून होणाऱ्या कृती साधारणपणे शारीरिक, शाब्दीक आणि मानसिक अशा तीन पातळीवर घडतात. कायद्यानुसार आपण बहुधा शारीरिक व शाब्दीक क्रियांना अधिक महत्व देतो, आणि मानसिक क्रियांना गौण स्थान देतो. एखाद्या व्यक्तीवर तलवारीचा वार करणं, हे शिव्या देण्यापेक्षा कायद्याने जास्त गंभीर कृत्य समजले जाते. मानसिक क्रिया ज्या एखाद्या व्यक्तीविषयी मनातल्या मनात पेटलेल्या असतात, अव्यक्त व्देष, राग,संताप,चिड, सूड घेण्याची प्रवृत्ती, याला तर आपण अगदी गौणच समजतो. कारण, मानसिक क्रिया अव्यक्त असल्यामुळे त्याला तर आपल्याकडे काही स्थानच नाही. परंतु मानसशास्त्राचा विचार केल्यास मानसिक क्रियांना सर्वाधिक महत्व असल्याचं दिसेल. कारण माणसाच्या शारीरिक आणि शाब्दीक क्रियांची पायामुळे ही मानसिक क्रियांमध्ये बघायला मिळतात. थोडक्यात शारीरिक व शाब्दीक क्रियांच्या मागे मानसिक क्रियांची प्रेरणा कार्यरत असते. मानसिक क्रियांशिवाय शारीरिक व शाब्दीक क्रिया घडूच शकत नाहीत. मानसिक क्रियांना आपण दैनंदिन व्यवहारात  मन म्हणतो. सकारात्मक व नकारात्मक वर्तनांची बिजे माणसाच्या मनात बघायला मिळतात.  म्हणून, माणसाने आपले मन, विचार आणि भावनांविषयी फार सजग असले पाहिजे. हि सजगता सरावाने आत्मसात केली पाहिजे. सजग नसलेला माणूस आपल्या मनाचा गुलाम बनतो; आणि सजग माणूस आपल्या मनालाच गुलाम बनवितो. मनाचा गुलाम असलेला माणूस मनमानी वर्तन करतो; मनाचा मालक असलेला माणूस स्वतःच्या मनाला हव्या त्या कामात, हव्या त्या वेळी, हव्या त्या ठिकाणी गुंतवण्यात यशस्वी होतो. सजग लोक मनाला नियंत्रित करून नेहमी सकारात्मक वर्तन करीत असतात; स्वतः आनंदी आणि त्यांच्या सहवासातील लोकांना  देखील आनंदी बनवीत असतात.
      नेहमी आपल्या मनाप्रती सजग रहा, सकारात्मक कृती करा, स्वतःचा व इतरांचा आनंद वाढवा. आनंदी राहणं हे चांगल्या लोकांचा सहवास, भरपूर संपत्ती, मोठं पद, प्रतिष्ठा, प्रसिद्धी, दागिने, रूपसौंदर्य यावर अवलंबून नाही; तर सगळ्यात जास्त आपल्या मनःस्थितीवर अवलंबून आहे. याचा अर्थ असा मुळीच नाही, की वरील गोष्टी अजिबात पाहिजे नाही. त्या आवश्यक आहेतच परंतु त्या पेक्षा सकारात्मक, प्रसन्न, आनंदी मन खूप आवश्यक आहे. सकारात्मक मन असेल तेव्हाच श्रीमंत लोकांना देखील साधन-संपत्तीचा आनंद लुटता येईल. अन्यथा मनाने अशुद्ध असलेले गर्भश्रीमंत लोक सुद्धा गृहकलहांचे शिकार बनतात.
       प्रत्येक माणसाला पोट भरण्यासाठी कोणातरी व्यवसाय करावा लागतो. सकारात्मक व्यवसाय आनंदायी आहे. कोणताही व्यवसाय सकारात्मक व्यवसाय दोन बाबीमुळे ठरतो. पहिली बाब म्हणजे आपल्या व्यवसायातून इतर लोकांना कोणतीही इजा पोहचता कामा नये. दुसरी बाब म्हणजे आपल्या व्यवसायात हत्या करणे, चोरी करणे, पर स्त्रियांशी शरीरसंबंध, खोटे बोलणे आणि नशा करणे, ह्या पाच गोष्टी नकोत.  ह्या दोन गोष्टी नसतील तर कोणताही व्यवसाय सकारात्मक व्यवसाय बनतो. शिक्षकांचा व्यवसाय प्रत्येक देशाच्या  प्रगतीच्या पाठीचा कणा असतो. परंतु विद्यार्थ्यांशी गैरवर्तन करणाऱ्या शिक्षकांचा व्यवसाय सकारात्मक होऊ शकत नाही. कारण गैरवर्तन करताना शिक्षक पहिले त्याच्या स्वतःच्या मनाची सुखशांती, आनंद, प्रसन्नता घालवितो आणि नंतर विदयार्थी, पालकांची सुखशांतीला धोका निर्माण करतो. सर्वप्रथम स्वतःचा आनंद गमावून बसणारा माणूस इतरांचा आनंद हिरावून घेत असतो. कोणतेही काम करताना स्वतःचा आनंद सांभाळा म्हणजे इतरांचा आनंद देखील आपोआप सांभाळला जातो. म्हणून मनाची सकारात्मकता, सजगकता हि खरी आनंदाची चावी आहे, असं म्हटल्यास फारसं वावगं होणार नाही.







  


Comments

  1. atishay sunder lekh aahe sir
    kewal aani kewal aanad milwanyasathi aanad dusaryanna denyasathi ,, aani aanad ghenya karita fkt manushya chya angi sakaratmakta asan mahtwach aahe majech khara aanad milato

    ReplyDelete
  2. Really very important issue you to bring bring into focus through your writing with true facts in social life

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..