जागतिक फादर डे च्या निमित्ताने….

 जागतिक फादर डे च्या निमित्ताने…. 



आई-वडिलांच्या खुप आठवणी आहेत…ज्या मला नेहमी प्रेरणा देत असतात…तशी आमच्याकडे शेती वैगरे काही नव्हती…आई अन् वडिलांनं मोठ्या कष्टानं तीन एक्कर शेत विकत घेतलं…त्यात ते  बऱ्यापैकी पीक घेत असतं…मी तिसऱ्या वर्गात शिकत असताना…आम्ही वाशिम येथे साळी (भात) विकायला गेलो होतो…साळीच्या पोत्यांनी गाडी भरली होती…मी पोत्यांवर बसलो होतो…वडील गाडी हाकत होते…आमच्याकडे नंद्या-देवमन्या ही लाडकी बैल जोडी होती…रांगडे बैलं झपाझपा चालायचे…वाशिमच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत पोहोचायला सकाळचे दहा वाजले होते…लिलाव सुरू व्हायला वेळ होता…वडीलांनी हॉटेलतून भजी आणली होती…आम्ही दोघेही बापलेक पोत्यांवर बसून जेवलो…आईनं छान भाकर बांधून दिली होती…लिलाव झाला…वडिलांनी पैसे घेतले…आईसाठी साडी घेतली…माझ्यासाठी आणि बहिणींसाठी कपडे घेतले (माझ्या आयुष्यात वडीलांनी मला घेतलेले हे शेवटचे कपडे)…मामा वाशिम डेपोला कंडक्टर होते…त्यांची भेट घेऊन घरी निघणार होतो…वडिलांनी चौकशी केली…तर मामांना उशीर होणार होता…संध्याकाळ झाली होती…त्यामुळे वडिलांनी बैलगाडी गाडी काढली…वाशिमच्या बाहेर पडल्यावर अंधार झाला होता…जशी जशी गाडी अंधारात रस्ता कापत होती…तस तशी वाशिम शहराचे लाईट अन् आजूबाजूच्या खेड्यांचे लाईट आरास केल्यासारखी भासत होते…पुस्तके अन् कपडे मिळाल्याने मी अगदी खुश…आपलं घर कधी येईल सारखा विचारत होतो…मधी-मधी वडील गोष्टी सांगून माझं लक्ष विचलित करायचे….वडिलांना वाचनाची खूप आवड…. त्यामुळे भरपूर गोष्टी त्यांना पाठ होत्या…फावल्यावेळी ते वाचन करीत असत…शिवाजी महाराजांचा इतिहास त्यांच्या खूप आवडीचा विषय…त्यांचं वाचन म्हणजे मुख वाचन…ते मोठ्या आवाजात वाचायचे…त्यामुळे त्यांनी वाचलेललं सर्व आमच्या कानावर पळायचं….त्यामुळे लहानपणी मलाही अभ्यासाची गोडी लागली…तीच आज माझ्या कामी आली…मी खुप शिकावं…मोठं व्हावं… त्यांचं स्वप्न होतं…पण मी आज प्राध्यापक झालो…हे बघायला ते हयात नाहीत… धन्यवाद बाबा… आज तुम्ही माझ्या सोबत नाही…. पण तुमचे संस्कार अजुनही माझी साथ करीत आहेत…

डॉ. नागोराव डोंगरे 

Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती