मानसशास्त्राच्या शाखा किंवा क्षेत्रे
मानसशास्त्राच्या शाखा किंवा क्षेत्रे
(Branches of Psychology):
मानवी विचार, भावना आणि वर्तन यांचे वैज्ञानिकदृष्ट्या परीक्षण करण्यासाठी मानसशास्त्राच्या अनेक वेगवेगळ्या शाखा गेल्या काही वर्षांत विकसित झाल्या आहेत.यात आणखी नवनवीन शाखा निर्माण होऊन मानसशास्त्राचा विस्तार दिवसेंदिवस वाढतच आहे. या शाखांमध्ये खालील शाखांचा समावेश आहे:
अ) चिकित्सा मानसशास्त्र (Clinical Psychology):-चिकित्सा मानसशास्त्र हे एक असे क्षेत्र आहे, जे क्लिनिकल किंवा हॉस्पिटलच्या परिस्थित मानसशास्त्रीय संशोधन आणि तंत्रे उपयोगात आणते. शारीरिक आजारांसारखेच काही मानसिक आजार असतात.
जे लोक मनाने आजारी असतात त्यांना ‘मनोरुग्ण’ म्हणतात. "चिकित्सा मानसशास्त्र म्हणजे मनोरुग्णाच्या वर्तनात बदल (परिवर्तन) घडवून आणण्याच्या उद्देशाने, निरीक्षण किंवा प्रयोगाद्वारे व्यक्तींचा अभ्यास" आहे.
चिकित्सा मानसशास्त्राचे क्षेत्र "क्लिनिकल” म्हणजे दवाखाना हे आहे, कारण त्यात हॉस्पिटल मधील मनोरुग्णांच्या वर्तनाचे निरीक्षण करणे, त्याच्या आजाराचे निदान करणे, त्यावर योग्य ते उपचार करने आणि त्याचे पुनर्वसन करणे, अशी कार्य केली जातात. तथापि, मानसशास्त्रज्ञ इतर आरोग्यसेवक किंवा सामाजिक कार्यकर्त्यांच्या टीमचा भाग म्हणून देखील काम करू शकतात.
चिकित्सा मानसशास्त्रज्ञ व्यक्ती, कुटुंबे आणि इतर गटांना समुपदेशन केंद्रे, शाळा आणि रुग्णालये यांसारख्या ठिकाणी भेटी देतात. ते सामुदायिक व् खाजगी हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्र, वृद्धाश्रम यासारख्या सेवा केंद्रांमध्ये देखील काम करू शकतात. बहुतेक मनोरुग्न त्यांच्या स्वत: च्या इच्छेनुसार खाजगी किंवा सरकारी होस्पिटलमधून मानसशास्त्रीय सेवा घेत असतात. परंतु काहीवेळा न्यायालये, विमा कंपन्यांद्वारे नैदानिक मानसशास्त्रज्ञांना मनोवैज्ञानिक मूल्यांकन करण्यासाठी नियुक्त केले जाते. ते न्यायालये आणि विमा कंपन्यांना कायदेशीर निर्णयांची माहिती देण्याचे काम करतात. माहिती गोळा करणे आणि लाभार्थ्यांच्या विविध (क्लायंट) भेट सत्रांचे अचूक रेकॉर्ड राखणे हा त्यांच्या कामाचा भाग असतो.
चिकित्सा मानसशास्त्रज्ञ सर्व वयोगटातील आणि सर्व स्तरातील लोकांसाठी मानसिक आरोग्य सेवा प्रदान करतात. मानसशास्त्रतज्ञ (Psychologist) आणि मानसोपचारतज्ञ (psychiatry) या दोघांच्या विषयी अनेकदा गोंधळ होतो. कारण दोन्ही मानसिक आणि भावनिक आजारांवर उपचार करतात. परंतु या दोघांच्या बाबतीत दिले जाणारे शिक्षण-प्रशिक्षण आणि त्यांच्या लाभार्थींवर उपचार करण्याच्या पद्धती अगदी भिन्न आहेत. मानसशास्त्रज्ञ अशा लोकांवर उपचार करतात ज्यांचे मानसिक आजार भूतकाळातील भावनिक आघातांमुळे निर्माण झालेले असतात. ते उपचारांमध्ये सामान्यतः टॉक थेरपी आणि इतर गैर-वैद्यकीय तंत्रांचा वापर करून मानसिक आजारांवर उपचार करतात. मानसशास्त्रज्ञ वैदयकिय शास्त्रातील MBBS किंवा MD डॉक्टर नसतात, तर ते मानसशास्त्रात M.A., M. Phil & Ph.D ही पदवी प्राप्त केलेले असतात. जेव्हा एखाद्या मनोरुग्णाच्या आजारांचे कारण त्यांच्या मेंदूतील रासायनिक असमतोलात किंवा इतर काही शारीरिक बिघाडांमध्ये असतात, तेव्हाच मानसोपचारतज्ज्ञ उपचार करतात. ते वैद्यकीय डॉक्टर (MD) असतात, ते मानसिक आजारांच्या वैद्यकीय उपचारांमध्ये तज्ञ असतात. मानसशास्त्रज्ञ औषधे लिहून देऊ शकत नाहीत, तर मानसोपचारतज्ज्ञ औषधे लिहून देतात.
ब) समुपदेशन मानसशास्त्र (Counseling Psychology): समुपदेशन म्हणजे ज्यांना मानसशास्त्रीय समस्या आहेत अशा व्यक्तींना मार्गदर्शन करणे आहे. समुपदेशन मानसशास्त्र हे मानसशास्त्रातील एक व्यावसायिक शाखा आहे, जी आयुष्यभर सर्व वयोगतातील लोकांना व्यक्तिगत आणि सामूहिक पातळीवर समुपदेशन करते.
समुपदेशन म्हणजे सल्ला किंवा मार्गदर्शन करणे होय. समुपदेशन मानसशास्त्रज्ञ लोकांना समस्यांना तोंड देण्यास आणि त्यांच्या जीवनातील विविध परिस्थितीत कठीण निर्णय घेण्यास मदत करतात. समुपदेशन मानसशास्त्रज्ञ सामान्यतः विकासात्मक आणि मानसिक आरोग्याच्या समस्यांवर, लोकांच्या आयुष्यातील आव्हाने, तसेच समूह, कार्यस्थळे, संस्था, आणि समुदायांमध्ये उदभवलेली प्रणालीगत आव्हाने (जसे की पूर्वग्रह आणि भेदभाव) यावर शास्त्रशुध्द समुपदेशन करतात.
ते भावनिक समस्या, बिघडलेले नातेसंबंध, शारीरिक आजार, मानसिक आरोग्य, सामाजिक समस्या, सांस्कृतिक समस्या, व्यावसायिक समस्या, शैक्षणिक समस्यांवर मार्गदर्शन करतात.
समुपदेशन मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणार्या कार्यपद्धती आणि तंत्र हे पुढील प्रमाणे आहेत. वैयक्तिक, कौटुंबिक आणि गट समुपदेशनासोबत मानसोपचार देखील केले जातात. त्यात संकट हस्तक्षेप, आपत्ती आणि आघात व्यवस्थापन केले जाते. कार्यशाळा घेवून लोकांना मानसिक आरोग्य, शाळा, कुटुंब, नातेसंबंध आणि कामाच्या ठिकाणच्या समस्यांबद्दल शिक्षित करतात. जेणेकरून समस्या सुरू होण्याआधीच टाळता येऊ शकतात किंवा त्या अधिक चिघडण्यापूर्वी कमी केल्या जाऊ शकतात.
समुपदेशन मानसशास्त्रज्ञ म्हणून सराव करण्यासाठी त्याच्याकडे शासन परवाना असणे आवश्यक आहे.
चिकित्सा मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशन मानसशास्त्रज्ञ यांच्यात काय फरक आहे? समुपदेशन मानसशास्त्रज्ञ रुग्णांना त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक समजून घेण्यावर आणि त्यांचे निराकरण करण्यासाठी मदत करतो; तर क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ विशिष्ट मानसिक आजाराचे निदान आणि त्यावर उपचार करतो. वरवर विचार करता आपणास समुपदेशन आणि सामान्य मार्गदर्शन सारखेच वाटतात. पण त्या दोन भिन्न गोष्टी असून त्यात पुढील फरक आहेत.
क)सकारात्मक मानसशास्त्र (Positive Psychology): कोणत्याही वयातील सर्वात मोठा प्रश्न म्हणजे: एखादी व्यक्ती खरोखर आनंदी कशी असू शकते? हा सकारात्मक मानसशास्त्राचा प्रश्न आहे.
सकारात्मक मानसशास्त्र हे, व्यक्तीच्या जीवनातील सकारात्मक गुणांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे - उदा. आनंद, समाधान आणि आभार भावना यांचा अभ्यास करते. मार्टिन सेलिग्मन यांना सकारात्मक मानसशास्त्राचे जनक मानतात.
त्यांनी सकारात्मक मानसशास्त्राची तीन उद्दिष्टे अधोरेखित केले आहेत; आणि सकारात्मक मानसशास्त्राच्या एकूण अभ्यासाचे महत्व सांगितले आहे. 1) मानसशास्त्राने माणसाच्या नकारात्मक गुणांचा जेवढा अभ्यास केला पाहिजे तितकाच सकारात्मक गुणांचा केला पाहिजे; असे ते म्हणाले. 2) मानसशास्त्राला जेवढा मानसिक बिघाड दुरुस्त करण्यात रस असतो तेवढाच त्याला जीवनातील सर्वोत्तम गोष्टी तयार करण्यात देखील रस असला पाहिजे. 3) अपसामान्य लोकांप्रमाणे सामान्य लोकांचे जीवन परिपूर्ण करण्यासाठी मानसशास्त्राने प्रयत्न केले पाहिजे.
ख्रिस्तोफर पीटरसन, या प्रख्यात मानसशास्त्रज्ञाने, सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या “मानवी जीवनाला सार्थक (अर्थपूर्ण) बनवणारा वैज्ञानिक अभ्यास अशी केली आहे”. मानवी विचार, भावना आणि वर्तन यांचा सकारात्मक अभ्यास करणे हा एक सकारात्मक मानसशास्त्राचा दृष्टीकोन आहे. ज्यामध्ये माणसाच्या कमकुवपणा ऐवजी त्याच्या सामर्थ्यांवर जोर दिला जातो. वाईट गोष्टींना दुरुस्त करून जीवन चांगले बनवता येते; लोकांचे जीवन चांगले बनविणे पुरेसे नसून महान बनवता आले पाहिजे, असे सकारात्मक मानसशास्त्र मानते.
सकारात्मक मानसशास्त्र तीन स्तरांवर कार्य करते. १) व्यक्तिनिष्ठ स्तर: आनंद, कल्याण, आशावाद आणि तत्सम भावना आपल्या दैनंदिन अनुभवाशी संबंधित असतात. व्यक्तीच्या भावनांचा अभ्यास व्यक्तिनिष्ठ स्तरावर केला जातो. 2) वैयक्तिक स्तर: वैयक्तिक स्तर कल्याणच्या व्यक्तिनिष्ठ स्तरावरील भावनांना गुण किंवा सद्गुणांसह एकत्रित करते जे तुम्हाला एक चांगली व्यक्ती बनवते, जसे की क्षमा, प्रेम आणि धैर्य. 3) गट स्तर: गट स्तर आपल्या समुदायाशी सकारात्मक परस्परसंवादावर लक्ष केंद्रित करते आणि त्यात परोपकार, सामाजिक जबाबदारी आणि सामाजिक बंधने मजबूत करणारे इतर सद्गुण यांचा समावेश होतो.
ड)औद्योगिक मानसशास्त्र(Industrial Psychology): औद्योगिक मानसशास्त्र हे कामाच्या ठिकाणी मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी, विश्लेषण करण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी कार्य करणारी मानसशास्त्राची शाखा आहे; ज्यात मुख्यतः कंपनी कसी कार्य करते आणि कर्मचारी कसे कार्य करतात याचा अभ्यास केला जातो. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ कंपनीच्या संस्कृतीचा, कर्मचार्यांचे वर्तन आणि कामाच्या प्रक्रियेचा अभ्यास आणि कामाचे मूल्यांकन करतात आणि कर्मचारी उत्पादकता आणि संस्थात्मक कार्यप्रदर्शन सुधारण्यासाठी कार्यक्रम आणि पद्धती तयार करतात. औद्योगिक मानसशास्त्रज्ञ मानव संसाधन विभागाला भरती प्रक्रियेच्या विकासासाठी आणि कर्मचार्यांच्या निवडीसाठी मदत करतात. नोकरीचे विश्लेषण करतात, कार्य प्रभावीपणे करण्यासाठी आवश्यक कौशल्ये आणि क्षमता निर्धारित करतात. या विश्लेषणांमधून मिळालेली माहितीच्या आधारे कर्मचारी प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करतात. औद्योगिक मानसशास्त्राचे क्षेत्र कर्मचारी समाधान, कार्य प्रेरणा, कर्मचारी आरोग्य, सुरक्षितता आणि कल्याण यांच्याशी संबंधित आहे. कामावरील आनंदाचे मूल्यांकन करणे आणि कामाचे वातावरण सुधारण्याचे मार्ग शोधणे आणि आवश्यक असल्यास, कार्य आणि जीवन यांच्यात संतुलन कार्यक्रम लागू करतात.
इ)सामाजिक मानसशास्त्र (Social Psychology): जेव्हा एकापेक्षा अधिक लोक कोणत्यातरी उद्देशाने एकत्रीत येतात तेव्हा ‘समाज’ निर्माण होतो.
कुटुंब हे समाजाचे छोटे रूप आहे. लोक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्यांना ‘समाजाचे लिखित-अलिखित नियम’ पाळावे लागतात. हे नियम पाळल्याने समाजात शांतता आणि सुव्यवस्था राहते. माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो आपल्या शारीरिक, सामाजिक आणि आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी समाजात राहतो.
सामाजिक मानसशास्त्र म्हणजे लोकांचे विचार, भावना, श्रद्धा, हेतू आणि उद्दिष्टे सामाजिक संदर्भात इतरांशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परस्परसंवादाद्वारे कशी तयार होतात, याचा वैज्ञानिक अभ्यास आहे.
सामाजिक मानसशास्त्रात व्यक्तीचा समूहाच्या वर्तनावर कसा प्रभाव पडतो? सामाजिक परस्परसंवादातुन लोकांच्या धारणा आणि कृती कशा प्रभावित होतात? व्यक्ती, राजकीय नेते, वर्तमानपत्रे, टीव्ही, मासिके, वेबसाइट्स आणि इतर माध्यमे वारंवार लोकांना प्रभावित कशी करतात ? यांचा अभ्यास करते.
आपल्यापैकी प्रत्येकजण वेगळा आहे आणि आपली वैयक्तिक वैशिष्ट्ये, आपल्या व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये, इच्छा, प्रेरणा आणि भावनांचा आपल्या सामाजिक वर्तनावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. परंतु आपले वर्तन देखील सामाजिक परिस्थितीवर खोलवर प्रभाव टाकते. ज्या लोकांशी आपण दररोज संवाद साधतो. या लोकांमध्ये आमचे मित्र आणि कुटुंब, आमचे वर्गमित्र, आमचे धार्मिक गट, आम्ही ज्या लोकांबद्दल टीव्हीवर पाहतो किंवा ऑनलाइन वाचतो किंवा त्यांच्याशी संवाद साधतो, तसेच ज्या लोकांबद्दल आम्ही विचार करतो, लक्षात ठेवतो किंवा अगदी कल्पना करतो अशा लोकांचा समावेश होतो.
ई)वैकासिक मानसशास्त्र (Developmental Psychology): लोकांचा शारीरिक, सामाजिक, मानसिक आणि भावनिकदृष्ट्या कालांतराने कसा विकास होतो; याचा अभ्यास वैकासिक मानसशास्त्र करते.
माणसात काही बदल हे आपोआप होतात. त्यासाठी माणसाला कोणतेही श्रम करण्याची आवश्यकता नसते. उदा. उंची, वजन, केसांची वाढ, नखांची वाढ हे आपोआप होणारे शारीरिक बदल आहेत. तर काही बदल माणूस मेहनतीने स्वतःत घडवून आणतो. उदा. सायकल चालवायला शिकणे, पोहणे शिकणे, विविध भाषा शिकणे हे बदल श्रमाने घडवून आणले जातात.
प्रगती सूचक बदलांच्या मालिकेला विकास असे म्हणतात. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत माणसाच्या सर्व प्रकारच्या विकासाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे वैकासिक मानसशास्त्र होय.
मानव त्यांच्या आयुष्यादरम्यान कसा आणि का वाढतो, बदलतो आणि जुळवून घेतो याचा वैज्ञानिक अभ्यास वैकासिक मानसशास्त्र आहे.
हा अभ्यास मूलतः अर्भके आणि मुलांशी संबंधित आहे. परंतु या शाखेचा विस्तार जन्मपूर्व अवस्थेपासून बाल्यावस्था, किशोरावस्था, तारुण्यावस्था,प्रौढवस्था, वृद्धावस्था आणि मृत्यपर्यंत आहे. अधिक माहितीसाठी https://youtu.be/8BH7WFmRs-E?si=PcKg2iYLAF0ehf3K येथे क्लिक करा.
प) गुन्हेगारी व न्यायवैद्यकीय मानसशास्त्र (Criminal & Forensic Psychology): गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ अशा क्षेत्रात काम करतो ज्यामध्ये गुन्हेगारी अणि न्यायालय या दोन क्षेत्रासोबत मानसशास्त्राचा सहयोग होतो.
गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ अनेकदा न्यायिक प्रणालीतील, कायद्याची अंमलबजावणी करणारे न्यायधीस, वकील, गुन्हेगार आणि इतर एजन्सींच्या सदस्यांसह कार्य करतात आणि त्यांचे तज्ञ विश्लेषण अनेक क्षेत्रांमध्ये देत असतात.
गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञांचे बहुतेक काम संशोधन करणे, गुन्हेगारी वर्तनाचे मूल्यांकन करणे आणि अहवाल लिहिणे हे असते. गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ गुन्हेगारांच्या विचारांचे आणि वागणुकीचे मूल्यमापन करू शकतात, खटला चालवण्याची आरोपीची क्षमता निर्धारित करू शकतात किंवा गुन्हा दाखल करताना प्रतिवादीच्या मानसिक स्थितीबद्दल चाचणी दरम्यान तज्ञ म्हणून साक्ष देऊ शकतात. गुन्ह्यांचे बळी असलेल्यांसोबत काम करू शकतात.
अनेक गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ गुन्हेगारांना दोषी ठरविल्यानंतर त्यांचे पुनर्वसन करण्यात मदत करण्यासाठी त्यांच्याबरोबर काम करतात; जेणेकरून त्यांना सामान्य लोकांमध्ये पुन्हा प्रवेश मिळेल. थोडक्यात, गुन्हेगारी मानसशास्त्र हे गुन्हेगारी वर्तनाची कारणे शोधणे आणि संशयितांचे विचार समजून घेणे, गुन्हेगाराचे गुन्हा करण्यामागील विचार समजून घेणे, हेतू समजून घेणे, गुन्ह्याची कृती समजून घेण्याचा अभ्यास आहे.
फॉरेन्सिक मानसशास्त्र हे शाखा चिकित्सा आणि न्यायालय या विभागाच्या एकत्रीकरणातून बनली आहे. म्हणून तिला ‘न्यायवैद्यकीय मानसशास्त्रज्ञ’ असे म्हणतात.
कायदेशीर प्रश्नांशी संबंधित क्षमतांचे वर्णन आणि मोजमाप हे फॉरेन्सिक मानसशास्त्राचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. म्हणून, त्याने कायद्यासोबतच चिकित्सा मानसशास्त्राचे प्रशिक्षण घेणे आवश्यक असले तरीही, वैद्यकीय मूल्यमापन कौश्यले, मुलाखत कौश्यले, अहवाल लेखन कौश्यले, मजबूत मौखिक संभाषण कौशल्ये (विशेषत: कोर्टात तज्ञ साक्षीदार असल्यास) आणि केस प्रेझेंटेशन यांसारखी कौशल्ये फॉरेन्सिक सायकॉलॉजीच्या कार्याचा खूप महत्त्वपूर्ण भाग आहेत.
गुन्हेगारीच्या प्रकरणात बुद्धिमत्ता चाचणीचा उपयोग करून बुद्धिमापन करणे, क्षमता मापन करणे, पालक आणि मुलाच्या मूल्यमापनांसोबत कस्टडीतील मुलांचे मूल्यमापन करणे, शाळांमध्ये कोणते धोके आहे याचे मूल्यांकन करणे, गुन्ह्यांमध्ये पीडित असणाऱ्या लोकांना आणि गुन्हेगारांना समुपदेशन करणे, हे कार्य फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ करतात. अधिक माहितीसाठी https://dfsl.maharashtra.gov.in/en येथे क्लिक करा.
फॉरेन्सिक आणि गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ यांच्यात कार्यात पुढील फरक आहे. गुन्हेगारी मानसशास्त्रज्ञ गुन्हेगारी वर्तनावर लक्ष केंद्रित करतात; तर न्यायवैद्यकीय मानसशास्त्रज्ञ गुन्हेगारी आणि नागरी कायदा, तुरुंगात काम, जोखीम असलेल्या युवकांचे समुपदेशन आणि शैक्षणिक संशोधन इ. कामे करतात. फॉरेन्सिक मानसशास्त्रज्ञ गुन्ह्यांचे बळी, साक्षीदार, वकील आणि कायद्याची अंमलबजावणी करणार्या लोकांच्या विस्तृत मूल्यांकन करतात.
फ)पर्यावरण मानसशास्त्र (Environmental Psychology): पर्यावरण मानसशास्त्र हे लोक आणि त्यांच्या सभोवतालचे वातावरण यांच्यातील परस्परसंवादाबद्दल अभ्यास करणारे शास्त्र आहे.
ते एक मानसशास्त्राची शाखा म्हणून, हे समजून घेण्याचा प्रयत्न करते की, आपले वातावरण आपल्यावर कसा आणि का प्रभाव टाकते? आपण त्या ज्ञानाचा आपल्या फायद्यासाठी कसा उपयोग करू शकतो? आणि आपल्या सभोवतालच्या जगाशी आपले संबंध सुधारण्यासाठी आपण काय करू शकतो? एगॉन ब्रन्सविक ही कदाचित पहिली व्यक्ती होती, ज्याने ‘पर्यावरणीय मानसशास्त्र’ हा शब्द प्रिंटमध्ये वापरला होता.
लोकांना त्यांचे वर्तन बदलण्यास प्रवृत्त करणार्या साहित्यावर संशोधन करणे. पर्यावरणीय उपायांबद्दल माहितीचा प्रसार व प्रचार करणे. लोक सकारात्मक आचरण का स्वीकारत नाहीत या मागील मनोसामाजिक कारणे उघड करणे. लोकांना नैसर्गिक जगातील मानवाचे काय स्थान आहे यावर पुनर्विचार करण्यास प्रोत्साहित करणे, इ. कामे पर्यावरण मानसशास्त्रज्ञ पार पाडतात.
ब)स्त्रियांचे मानसशास्त्र (Women Psychology): असे म्हटले जाते की पुरुष आणि स्त्रिया एकमेकांपेक्षा वेगळे आहेत, जणू काही ते वेगवेगळ्या ग्रहांचे आहेत. आकार आणि शरीरशास्त्रातील आपले शारीरिक फरक स्पष्ट असले तरी, लिंगांमधील मानसिक फरकांचा प्रश्न खूपच गुंतागुंतीचा आणि विवादास्पद आहे.
जेव्हा मानसशास्त्रज्ञ स्त्री-पुरुषांमध्ये काय फरक आहेत ते शोधतात, तेव्हा सहसा त्याची कारणे जन्मजात, जैविक किंवा सामाजिक आणि सांस्कृतिक आहेत की नाही यावर वाद होतात.
स्त्री आणि पुरुष वेगळे जन्माला येतात की समाज त्यांना तसा आकार देतो? जेव्हा स्त्रीपुरुषाच्या व्यक्तिमत्त्वातील फरकांचा विचार करतो, तेव्हा हे प्रश्न विशेषतः काटेरी असतात. बहुतेक संशोधन असे सूचित करतात की पुरुष आणि स्त्रिया खरोखरच काही महत्त्वाच्या वैशिष्ट्यांवर भिन्न असतात. पण हे फरक जीवशास्त्र किंवा सांस्कृतिक दबावांचे परिणाम आहेत का? आणि वास्तविक जगात ते किती अर्थपूर्ण आहेत? एक शक्यता अशी आहे की बहुतेक फरक आकाराने लहान आहेत. परंतु ते एकत्रित केल्याने त्यांचे महत्त्वपूर्ण परिणाम होऊ शकतात.
स्त्रियांचे मानसशास्त्र हा एक मानसशास्त्रीय दृष्टीकोन आहे, जो स्त्रियांना आयुष्यभर भेडसावणाऱ्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांवर अभ्यास करण्यावर लक्ष केंद्रित करतो. स्त्री होण्याचा नेमका अर्थ काय ' हे समजून घेण्यासाठी स्त्री आणि पुरुष या दोघांसाठी स्त्री मानसशास्त्र हा एक महत्त्वाचा मार्ग आहे. स्त्री मानसशास्त्र: स्त्रियांच्या जीवन कथेचा अभ्यास करणे, त्यांचे आरोग्य आणि जीवनातील सर्व संक्रमणांना आव्हान देण्यासाठी अनुकूलतेचा शोध घेणे याचा अभ्यास करते.
मानसशास्त्रात स्त्रियांचा स्वतंत्र आभास करण्याची गरज का निर्माण झाली? तर गेल्या शतकात पाश्चात्य जगात महिलांमध्ये प्रचंड सामाजिक-औद्योगिक बदल झाले आहेत. यापुढे स्त्रीचे स्थान केवळ घरातच घरगुती कामे करणे, मुलांची काळजी घेणे एवढ्यापुरतेच सीमित राहणार नाही. कामाच्या ठिकाणी उच्च व्यवस्थापकीय पदांवर महिलांची विक्रमी संख्या भरती होत आहे. काही स्त्रिया घर काम करणार्या आईला महत्त्व देत नाहीत आणि काही महिलांमध्ये पुरुषांशिवाय एकटे राहण्याचा ट्रेड वाढतो आहे.
सरावासाठी प्रश्न:
१. हॉस्पिटलमध्ये मानसशास्त्रीय ज्ञानाचा उपयोग आणणारी मानसशास्त्राची शाखा कोणती ?
२. जे लोक मनाने आजारी असतात त्यांना काय संबोधतात?
३. चिकित्सा मानसशास्त्राची व्याख्या लिहा.
४. चिकित्सा मानसशास्त्रज्ञ कोणत्या ठिकाणी काम करतात?
५. मानसशास्त्रज्ञ आणि मानसोपचारतज्ञ यांच्यात काय फरक असतो?
६. समुपदेशन नेमकं कशाला म्हणतात ?
७. समुपदेशन आणि मार्गदर्शनातील कोणतेही दोन फरक सांगा.
८. सकारात्मक मानसशास्त्र कशाचा अभ्यास करते?
९. सकारात्मक मानसशास्त्राचा जनक कोण आहे?
१०. सकारात्मक मानसशास्त्राची व्याख्या लिहा.
११. सकारात्मक मानसशास्त्राचे तीन स्तर कोणते ?
१२. औद्योगिक मानसशास्त्राचे कोणतेही पाच कार्य सांगा.
१३. माणूस समाजात का राहतो?
१४. सामाजिक मानसशास्त्राची व्याख्या लिहा.
१५. मानवी विकासाची व्याख्या सांगा.
१६. वैकासिक मानसशास्त्राचा विस्तार कुठून कुठपर्यंत आहे?
१७. गुन्हेगारी मानसशास्त्राचे कोणतेही पाच कार्य लिहा.
१८. पर्यावरण मानसशास्त्र हा शब्दप्रयोग सर्वप्रथम कोणी वापरला?
१९. स्त्री मानसशास्त्र कशावर लक्ष केंद्रित करते?
२०. महिलांमध्ये कोणता ट्रेंड वाढतो आहे?
Comments
Post a Comment