मला समजलेले शाहू महाराज

 मला समजलेले राजर्षी शाहू महाराज

भारतीय इतिहासात अनेक राजे झाले. त्यांच्या कहाण्या इतिहासाच्या पानापानावर वाचायला मिळतात. राजा म्हणजे हुकुमशहा. 'राजा बोले दल हाले' उगीच म्हटलं जात नाही. पण काही राजे त्यांच्या कार्य कर्तुत्वानं भारतीय इतिहासात अजरामर सुद्धा झाले. असाच एक राजा म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड हॅरीस यांच्या उपस्थितीत २ एप्रिल १८९४ रोजी महाराजांनी कोल्हापूर संस्थांची सूत्रे हाती घेतली. तेव्हा महाराजांचं वय अवघं वीस वर्ष होतं. शाहू महाराजांनी राज्यारोहनानंतर लगेच कोल्हापूर संस्थांचा दौरा केला.‌ जेव्हा संस्थानातून छत्रपतीची स्वारी निघायची तेव्हा लागणारा खानापाणी त्या त्या गावातील गावकऱ्यांकडून विकत घेतल्या जायचा. पण त्याचा मोबदला मात्र त्यांना दिला जात नसे. मामलेदार, फौजदार, शिपाई, गावचा पाटील यांच्यातच तो गायप होत असे. रयतेवर होणारा जुलूम महाराजांनी स्वतःच्या डोळ्यांनी बघितला. तेव्हा स्वतःच्या अनुभवाच्या आधारे त्यांनी पहिला जाहीरनामा काढला. खेड्या गावातल्या रयतेमध्ये हर्षाची लाट आली. शाहू महाराजांनी आपल्या अनोख्या कार्य शैलीनं लोकांचा विश्वास संपादन केला. 


    शाहू महाराजांच्या जडणघडणीमध्ये सर स्टुअर्ट मिटफोर्ड फ्रेझर आणि सर रघुनाथराव व्यंकोजी सबनीस या दोन गुरुजनांचे मार्गदर्शन खूप महत्त्वपूर्ण राहिले. गुरूंच्या ऋणातून उतराई व्हावं म्हणून १८९८ मध्ये त्यांनी सबनीसांची कोल्हापूरच्या दिवाण पदी नेमणूक केली.


   साधारणतः‌ १८९९ ची ही घटना असावी. प्रथेनुसार शाहू महाराज परिवारासह कार्तिक स्नान करण्यासाठी पंचगंगा नदीवर गेले होते. सोबत राजारामशास्त्री भागवत देखील होते. महाराजांचे स्नान चालू असताना नारायण भटजी पुराणोक्त मंत्र म्हणत असल्याचे राजारामशास्त्रींच्या लक्षात आले. ही अपमान जनक बाब राजारामशास्त्रीनी शाहू महाराजांच्या लक्षात आणून दिली. महाराजांनी जाब विचारला तेव्हा "शूद्रासाठी पुराणोक्त मंत्रच लागू पडतात" हे प्रतिउत्तर देऊन नारायण भटाने खुलासा केला होता. पुराणोक्त मंत्र बोलण्यामागे 'आता जागात फक्त ब्राह्मण व शूद्र असे दोनच वर्ण शिल्लक राहिले. क्षत्रिय व वैश्य या दोन्ही वर्णाचे संस्कार लोप झालेत. वेदातील प्रथम दर्जाचे मंत्र हे ब्राह्मणांसाठी व पुराणातील दुय्यम दर्जांचे मंत्र शुद्रासाठी असतात' अशी धारणा नारायण भटाची होती. सेवेत असणाऱ्या सेवकाने त्यांना शूद्र म्हणावे ही घटना महाराजांच्या जिव्हारी लागली. ही घटना संपूर्ण संस्थानामध्ये वाऱ्याच्या वेगाने पसरली.‌ या घटनेमुळे ब्राह्मण वृंद आणि शाहू महाराज यांच्यामध्ये वाद निर्माण झाला. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे कोल्हापूर दरबारातील मुख्य पुरोहित आप्पासाहेब राजोपाध्ये यांनी राजवाड्यातील सर्व धार्मिक विधी वेदोक्त पद्धतीने करण्यास नकार देणे ही होती. महाराजांची दत्तक आई राणीसाहेब आनंदीबाई यांचा अंत्यसंस्कार वेदोक्त पद्धतीनं करण्यास नकार दिला गेला. 

    लोकमान्य टिळकांनी १९०१ मध्ये त्यांच्या केसरी या वृत्तपत्रात 'वेदोक्ताचे खूळ' या शीर्षेखाली दोन अग्रलेख लिहून ब्राह्मण वृंदांचे समर्थनच केले. या अपमानजनक घटनेमुळे महाराज अंतर्मुख आणि चिंतनशील बनले. वेदोक्त मंत्रांनी धार्मिक विधी केल्याने शाहू महाराजांचा उद्धार होणार होता असे नाही; तर तो त्यांच्या सामाजिक अधिकाराचा प्रश्न होता. ही चिंतनशीलताच पुढे सामाजात अमुलाग्र बदल घडविण्यासाठी त्यांना प्रवृत्त करताना दिसते. ही वेदोक्त प्रकरणाची घटना शाहू महाराजांच्या जीवनाला कलाटणी देणारी ठरली. 

   या घटनेनंतर शाहू महाराजांवर अनेक वेळा प्राणघातक हल्ले झाले. त्यांची कन्या अक्कासाहेब यांच्या विवाह सोहळ्यात दिनांक २१ मार्च १९०८ रोजी कोल्हापुरातील दामू जोशी, गणपतराव मोडक या दहशतवाद्यांनी बॉम्ब टाकण्याचा कट रचला होता. पण पुण्याहून कोल्हापुरात येणारा बॉम्ब वेळी पोहोचू न शकल्याने हा रचलेला कट व्यर्थ गेला. त्यांना धमकीची अनेक पत्रे देखील आली होती. 

    हे सगळं सुरू असताना २६ जुलै १९०२ रोजी महाराजांनी कोल्हापूर संस्थानात मागासलेल्या लोकांसाठी पन्नास टक्के आरक्षणाचा क्रांतिकारी जाहीरनामा प्रसिद्ध केला. बहूजन समाजातील लोकांना कोल्हापूरच्या संस्थांनात फारसे स्थान नव्हते. सगळीकडे ब्राह्मणांचे वर्चस्व असे. त्यांचे वर्चस्व मोडीत काढण्यासाठी बहुजन लोकांना नोकऱ्यात प्रवेश देणे आवश्यक होते. शाहू महाराजांनी केलेली सामाजिक न्याय आणि सामाजिक लोकशाहीची सुरुवात होती. हा जाहीरनामा वाचून ब्राह्मणांच्या तळपायातील आग मस्तकात गेली. महाराजांवर प्रचंड संताप आणि टिकाऊ होऊ लागली. लोकमान्य टिळकांनी सुध्दा शाहू महाराजांना 'बुद्धिभ्रंश' झाल्याची टीका केली होती. 

    बहूजन समाजात शिक्षणाविषयी खूप उदासीनता होती. त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी शिक्षण हे एकमेव साधन शाहू महाराजांना वाटत होते. महाराजांनी दत्ताजी घाडगे यांच्या अध्यक्षतेखाली कोल्हापुरातील प्रतिष्ठित मराठा लोकांची सभा भरवली. सर्वांच्या मदतीने १८ एप्रिल १९०१ रोजी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' ची कोल्हापुरात स्थापना झाली. भास्करराव जाधव, महादेव डोंगरे, श्रीपतराव शिंदे खंडेराव बागल, गणपतराव कदम या कार्यकर्त्यांच्या संयोगाने १९०८ मध्ये कोल्हापुरात 'मिस क्लार्क होस्टेल' हे अस्पृश्य मुलांसाठी सुरू करण्यात आले. मिस व्हायोलेट क्लार्क ही मुंबईचे गव्हर्नर सर जॉन क्लार्क यांची मुलगी होती. तिचे अस्पृश्य लोकांवर खूप प्रेम होते. तिने स्वतःच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित करून पाच हजार रुपयाचा निधी या वस्तीगृहाला भेट दिला होता. म्हणून तिचे नाव या वस्तीगृहाला देण्यात आले होते.

     १९०२ मध्ये शाहू महाराजांनी युरोपचा दौरा केला. इंग्लंड येथे बादशाह सातव्या एडवर्डच्या राज्यारोहन सोहळ्यास त्यांनी उपस्थिती लावली. सोबतच फ्रान्स आणि इटलीचा देखील दौरा केला. तेथील आधुनिक विज्ञानाने केलेली प्रगती, उद्योगधंदे, खेळाची मैदाणे, आधुनिक शेती, शिक्षण, धरणे, संग्रहालये आणि लोकांनी अंगीकारलेली लोकशाही जीवन मुल्ये‌ बघून महाराज खूप आश्चर्यचकित झाले. त्यामुळे त्यांचे पारंपारिक विचार बदलण्यास मदत झाली. 

    शाहू महाराजांना त्यांच्या जयंतीदिनी जर खरे अभिवादन करायचे असेल तर त्यांच्या विचारानुसार जीवन जगणे हेच खरे अभिवादन ठरेल. 


प्रा. डॉ. नागोराव डोंगरे

Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..