भीती जगात नाही, तर मनात आहे..

 


भिती जगात नाही, तर मनात आहे 

दिवाळीच्या सुट्टीत गावी आलोय...सकाळी रोज फिरण्याची सवय असल्यानं... नेहमीप्रमाणे सकाळी पाच वाजता फिरायला निघालो... हवेत छान गारठा दाटलेला... पुर्वेला लालबुंद सुर्य... अंगावरील घनदाट अंधार लोटत... स्वयम् प्रकाशी... सृष्टी उजाळण्यासाठी हळूहळू उगवत होता... मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात मी सुध्दा चालत होतो…रस्त्याच्या आजुबाजुला झालेला बदल न्याहाळत होतो…शेलुबाजार रोडवर चिखली गावाजवळ खुपचं बदल झालेला…दोन्ही बाजूला प्लॉटिंग लेआउट पडलेले…चिखली फाट्यावर एक भलं मोठं शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेलं…त्याला लागूनच खारी-टोस्टची फॅक्टरी…सगळ्या गोष्टी नवशहरीकरणाच्या दिशेनं चाललेल्या…


     आता सगळं उजाडलं होतं…सूर्याची कोवळी किरणे पसरू लागली…व्यायाम करण्यासाठी एका प्लॉटिंग लेआउट मध्ये मी प्रवेश केला…तेवढ्यात पाच सहा कुत्र्यांची झुंड माझ्या अंगावर धावली…मी आपला हातात मोबाईल धरून शांत थांबलेला…त्यात काळ्या रंगाचा कुत्रा…खूपच मस्तवाल…तब्येतीने गुबगुबीत…उंचपुरा अन् धाडधिपाड…बाकी तीन मात्र सामान्य प्रकृतीचे…जेव्हा मी जाग्यावर शांत उभा राहिलो…तेव्हा ते माझ्यापासून काही अंतरावर उभे राहून भुंकू लागले…काळा कुत्रा मात्र मागे जाऊन पुन्हा पुन्हा चाल करत होता…डांबरी रोडवर दगड देखील नव्हते…मी फारसा आक्रमक न होता…हाळ हाळ बोलून हाकलत होतो…मी खाली वाकून दगड उचलण्याची नुसती ॲक्शन केली…एवढ्या साध्या कृतीनं ती कुत्रे माझ्यापासून लांब पळाली…अन् त्यांच्या नजरेत नजर टाकून  उभा राहून पाहत होतो…आमचा सामना दोन-तीन मिनिटे चालला असावा…मी मात्र शांतच उभा…मला माहित होतं…मी जर यांना घाबरून पळालो…तर हे माझा पाठलाग करतील…मला आणखीच घाबरवतील…त्यामुळे मी त्यांच्या डोळ्याला डोळा देत उभा राहीलो…हळूहळू त्यांच्यातला आक्रमकपणा कमी झाला…ते माझ्यापासून दूर गेले…पण पांढऱ्या रंगाचा कुत्रा मात्र माझ्या जवळच बुडबुड करत होता…


हा साधा अनुभव मला मात्र बऱ्याच गोष्टी शिकून गेला…भीती हे जगात नाही तर माणसाच्या मनात असते…मनातील भीती एकदा का दूर झाली…मग जगातल्या कोणत्याही गोष्टीची भीती वाटत नाही…मग शत्रू कितीही धिपाड राहू दे…कितीही ताकतवान राहू दे…माझ्यावर धावून आलेल्या कुत्र्यांजवळ तिष्ण नखे होती…सुळ्यासारखी दात होती…मी मात्र निशस्त्र उभा…शांती…समजदारी हेच माझ्याजवळ हत्यार…धोके…संकटे क्षणोक्षणी  येतीलच…त्यांना आपण थांबू शकत नाही…कारण ते आपल्या हातात नसतं…पण शांत आणि समजदारीनं त्याचा सामना करणं आपल्या हातात असतं…सापाला घाबरून पळायचं की भीतीनं गारद होऊन तिथेच पळायचं…की शांतपणे निडर होऊन त्याचा सामना करायचं…हे आपली मन:स्थिती ठरवत असते…म्हणून भीती जगात नाही तर ते आपल्या मनात आहे…जशी शांती देखील आतून येते... तसाच लढण्याचा आत्मविश्वास देखील आतूनच येतो... एवढेच काय ते या क्षणाचं सत्य…

तुम्हाला काय वाटतं.. ते कमेंट करू निश्चित मांडा...


प्रा. डॉ. नागोराव डोंगरे 

Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती