मोलकरीण स्त्रीच्या हस्ते रावसाहेब कसबेचा सत्कार

मोलकरीण महिलेच्या हस्ते झाला विचारवंत प्रा. रावसाहेब कसबे सरांचा सत्कार 


 प्रसिद्ध विचारवंत मा. प्रा. रावसाहेब कसबे यांचा काल नाशिक येथे ८० व्या वाढदिवसानिमित्त  कामिनाताई किसन खिल्लारे (माझी मोठी बहीण) हिच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला... त्यावेळी विचारपिठावर मा. कसबे सरांच्या पत्नी आणि मा. उत्तम कांबळे साहेब उपस्थित होते...

ताई नाशिक येथे स्वतः धुनी-भांडी करण्याचं काम करते...तसच तिनं त्या क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी संघटना उभी केली... त्यामुळे तिला या कार्यक्रमात प्रमुख पाहुणी होण्याचा...आणि रावसाहेब कसबे सरांसारख्या व्यक्तीचा सन्मान करण्याचा बहुमान मिळाला...

  ताई आणि जिजाजी तसे दोघेही अक्षरशत्रु...म्हणजे अशिक्षित आहेत... पण त्यांना शिक्षणाविषयी आणि शिकणाऱ्या विद्यार्थ्यांविषयी खुप तळमळ... ही तळमळ मी प्राध्यापक झाल्यामुळे त्यांच्यात आली...माझं बारावीनंतरच शिक्षण ताईनं नाशिकला केलं...माझ्या जिजाजीना वाचता येत नाही.. पण पुस्तके विकत घेण्याची खूप आवड...मी एकदा त्यांना विचारलं... तुमच्या घरात कोणीच वाचत  नाही; मग पुस्तक का बर विकत घेता?... तेव्हा त्यांनी  दिलेलं उत्तर खूपच मार्मिक आणि दूरदृष्टीचं आहे... ते म्हणाले "आज माझ्या घरात कोणालाही वाचनाची आवड नाही;... पण माझे नातवंड शिकतील आणि हे पुस्तक वाचतील"... आजही त्यांच्या घरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बरेच पुस्तके बघायला मिळतील... ते स्वतः  आंबेडकरी चळवळीत सक्रिय काम करतात...वेगवेगळ्या कार्यक्रमात भाग घेतात...ताई आणि जिजाजींची जोडी तशी खुपचं समजदार... त्यांचे समाजात आणि समाजाबाहेर अनेक लोकांशी संबंध आहेत...

    1995 ला मी बारावीला होतो...राज्यशास्त्राचा माझा शेवटचा पेपर होता... घरात वडील खूपच सिरीयस... पेपरला जाऊ की नको... अशी मनात घालमेल सुरु होती.... "तुझा बाप तुझ्यासाठी लहानपणीच मेला होता;... जा पेपर देऊन ये... आम्ही आहोत इथे... जा"... असं म्हणून माझी आत्या यशोदाबाई यांनी मला पेपरला पाठवलं... माझे वडील मी इयत्ता चौथीत असतानाच वेडे झाले होते... मी पाचव्या वर्गापासूनच गावातील बायांसोबत निंदन-खुरपणी करीत शिकत होतो... मी चौथीत असतानाच कामिनाताईचं लग्न झालं... तिच्या लग्नानंतर दोनच महिन्यात वडील वेडे झाले... घरातला सगळा भार आईवर पडला... माझ्यापेक्षा मोठी बहीण नंदा... लहान बहीण बालूताई... लहानभाऊ रामेश्वर... आई आणि स्वतः मी...असा पाच लोकांचा परिवार आई सांभाळीत होती...नंदा लग्नाला आलेली... तेव्हा कोण्याही नातेवाईकांनी लक्ष न दिल्यानं तिचं लग्न एका दुसरपण्या, दारुड्या माणसासोबत आईनं करून टाकलं... त्याला तीन मुलं होती... नंदा मात्र लग्नाची कुवारी पोरगी... परिस्थितीमुळे आईला हे सगळं करावं लागलं... माझी आई...नंदाताई काम करायच्या...मी देखील शाळा सांभाळून काम करीत असे... कधी मजुरी वेळेवर मिळायची नाही...कधी कामच नसायचं...आम्ही चक्कीचं खाली पडलेलं पिठ आणायचो...त्याच्या भाकरी खायचो...चक्कीवाले शेषराव बुरे...आम्ही त्यांना आदराने काका म्हणायचो...ते आमच्या कडून कधी पैसे घेत...तर कधी तसच पिठ देत असत...तेव्हाच मला कळालं होतं...कोणी भावबंध कुणाचे नसतात...कुणी नातेवाईक कुणाचं नसतं...जग मतलबी आहे...पण मी नाशिकला गेल्यावर लोकांकडे बघायचा दृष्टिकोन बदलला...कामिनाताई आणि नंदाताई त्या दोघीही त्यांच्या घरी नांदत होत्या. सुखानं संसार करीत होत्या. 

   मी बारावीचा शेवटचा पेपर देऊन घरी आलो...वडीलानी मात्र प्राण सोडला नव्हता... घरी आल्यावर मी त्यांना पाणी पाजलं... अन् त्यांचा जीव गेला...सगळे नातेवाईक गोळा झाले... पण कमिनाताईला नशिकवरून अकोला जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यात  अरक गावी पोहोचणे शक्य नव्हते... तिला दुसऱ्या दिवशी तार केली...आणि मग ती चार-पाच दिवसानं घरी आली. 

     वडिलांचं उत्तर कार्य करण्यासाठी माझ्याकडे पैसे नव्हते...मी खूप कर्जबाजारी होतो... कारण... मी माझ्या वडिलांची तीन एक्कर आणि माझ्या चुलत्याची सोळा एक्कर... अशी एकूण एकोनाविस एक्कर शेती बरावित असताना करीत होतो...माझा चुलत भाऊ गोविंदा हिरामण डोंगरे यांच्याकडून मी पाच रुपये शेकड्याचे पैसे... व्याजाने घेऊन कॉलेज शिकत शेती करीत होतो... त्यावर्षी पावसाने दगा दिला... मी कर्जात बुडालो होतो... त्यातच वडिलांचा मृत्यू... काहीच कळत नव्हतं... मी माझ्या सगळ्या नातेवाईकांना सांगायचो... मी वडिलांच्या उत्तर कार्यात फार तर तुम्हाला चहा पाणी करू शकेन... उत्तर कार्याचं जेवण देऊ शकणार नाही... तेव्हा माझे जिजाजी किसन खिल्लारे आणि माझे मामा पांडुरंग खंडारे या दोघांनी पैसे गोळा करून वडिलाचं उत्तर कार्य पार पाडलं...

     माझ्या अंगावर झालेलं कर्ज फेडण्यासाठी...मी नाशिकला १९९५ ला गेलो होतो... माझे जिजाजी बांधकामाच्या साईटवर राहत असत... अन् सेंट्रिंग काम करीत असत... कामिनाताई गवंड्याच्या हाताखाली विटा देणं...रेती सिमेंटचा माल देणं... हे काम करायची... मी देखील नाशिकला गेल्यावर सेंट्रिंग काम करायला शिकलो... दिवसभर मजुरीनं सेंट्रींग काम करायचो...कामावरून सुट्टी झाल्यावर बिल्डिंगच्या दुसऱ्या-तिसऱ्या मजल्यावर... खडी-रेतीचे डेपू टाकण्याचं काम अंगावर उधळं घेऊन रात्री सात... कधी आठ वाजेपर्यंत करायचो...सहा ते आठ महिन्यात... मी पैसे गोळा केले... अन् गोविंदा डोंगरेचं कर्ज निल केलं...

     माझा १९९५-९६ या वर्षी शिक्षणात गॅप आहे... वर्षभर जिजाजीसोबत काम केलं... ते अधून मधून मला त्यांचे साहेब मंगेश बंकापुरे यांच्याकडे घेऊन जायायचे... माझी ते विचारपूस करीत... मी सुद्धा कोणताही आडपडदा न ठेवता... सर्वकाही सांगत असे... त्यांनी माझ्या जिजाजीला सांगितलं... "या मुलाला शिकावं, हा पोरगा निश्चित  काहीतरी बनेल"... तिथून माझा शिक्षणाचा खंडीत झालेला प्रवास पुन्हा सुरू झाला... तो अजूनही थांबला नाही...

     मी मानसशास्त्र घेण्याचा हेतू...नोकरी मिळविणे हा कधीच नव्हता...तर माणसं वेडे का होतात...हे समजुन घेणे होता...कारण ह्या सगळया गोष्टीचे चटके... अगदी लहानणापासूनच मी अनुभवत होतो...मिळेल ते पुस्तक अधाशासारखा वाचत होतो...ताई...जिजाजी खरचं तूम्ही जर समजदार नसते, तर आज मी प्राध्यापक झालो नसतो... तुम्हा दोघांच्याही कार्य कर्तुत्वाला शतशः सलाम...


प्रा. डॉ. नागोराव डोंगरे

 


या कार्यक्रमाचे लाईव्ह प्रक्षेपण मॅक्स महाराष्ट्र या मराठी टीव्ही चॅनलने केले आहे...कार्यक्रमाचा संपुर्ण व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा...

https://www.youtube.com/live/yFmDt2WLtZI?feature=shared


#रावसाहेब कसबे

#उत्तम कांबळे

Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II

मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती