मानसशास्त्राची ओळख

 मानसशास्त्राची ओळख (Introduction to psychology)

प्रस्तावना (Introduction): 

मानसशास्त्र हे मानवी वर्तन आणि मानसिक प्रक्रियांचा वैज्ञानिक अभ्यास करणारे शास्त्र आहे. इजिप्त आणि ग्रीसच्या प्राचीन संस्कृतींपासून तत्त्वज्ञानाची शाखा म्हणून मानसशास्त्र अस्तित्वात आले आहे. परंतु 1870 च्या दशकात वैज्ञानिक अभ्यासाची एक स्वतंत्र शाखा म्हणून मानसशास्त्राची निर्मिती झाली. मानसशास्त्र लोकांना मोठ्या प्रमाणात मदत करणारे शास्त्र आहे. लोक 'त्यांच्या विशिष्ट पद्धतीने' का वागतात? याचे विश्लेषण ते करते. मानसशास्त्रज्ञ लोकांना त्यांचे निर्णय घेण्यास, तणाव व्यवस्थापन करण्यास आणि भूतकाळातील वर्तन समजून घेऊन त्या आधारे भविष्यातील वर्तनाचा चांगल्या प्रकारे अंदाज लावतात आणि लोकांचे वर्तन सुधारण्यास मदत करतात. ह्या सगळ्या गोष्टी सर्व वयोगातील लोकांना अधिक यशस्वी करिअर, चांगले नातेसंबंध, अधिक आत्मविश्वास, उत्तम संवाद आणि  एकूणच जीवन आनंदी बनविण्यासाठी मदत करतात. 


1.1. मानसशास्त्राचे स्वरूप (Nature of psychology):

मानसशास्त्राला इंग्रजी भाषेत Psychology हा शब्दप्रयोग केला जातो. ‘Psychology’ हा शब्द ग्रीक भाषेतील psychē (सायके) आणि ग्रीकभाषेतील logos (लोगोस) या दोन शब्दांपासून तयार झाला. ‘सायके’ म्हणजे "श्वास, जीवनाचे तत्त्व, जीवन, आत्मा" होय; तर ‘लोगोस’ म्हणजे "भाषण, शब्द, कारण" एकत्र करून तयार केले गेलेले शास्त्र किंवा विज्ञान आहे. 17 व्या शतकाच्या मध्यात सायमन पार्टलिझच्या ‘ए न्यू मेथड ऑफ फिजिक’ च्या भाषांतरात मानसशास्त्र हा शब्द सर्वप्रथम दिसून आला आणि त्याचा अर्थ  "मानसशास्त्र हे आत्म्याचे ज्ञान आहे" असा सापडतो. आज, मानसशास्त्र हे मानसिक प्रक्रिया (विचार, भावना) आणि वर्तन यांचा अभ्यास करणारे विज्ञान आहे


अ) मानसशास्त्राचा अर्थ (Meaning of Psychology): मानसशास्त्र म्हणजे मानसिक प्रक्रियांचा (मन) आणि मानव-मानवेत्तर प्राण्याच्या वर्तनाचा शास्त्रशुद्ध दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र (विज्ञान) आहे. या व्याख्येत विविध संकल्पना दडलेल्या आहेत त्यांचा आपण थोडा सविस्तर विचार करू.

१. मानसिक प्रक्रिया (Mental Processes): मानव नैसर्गिकरित्या करू शकणार्‍या सर्व गोष्टी मानसिक प्रक्रियांमध्ये अंतर्भूत असतात. साधारणपणे मानसिक प्रक्रियांमध्ये स्मृती, भावना, समज-गैरसमज, कल्पना, विचार आणि तर्कशक्ती यांचा समावेश होतो. ह्या सर्व मानसिक प्रक्रिया मानवी वर्तनाचा पाया आहेत; यांच्याशिवाय माणसाचे कोणतेही वर्तन घडू शकत नाही. परंतु मानसिक प्रक्रिया ह्या माणसाच्या वर्तनाच्या पाठीमागे असतात त्या दिसू शकत नाहीत. वर्तनावरून त्यांचा अंदाज किंवा अनुमान करता येते. 

२. मानव-मानवेत्तर प्राणी वर्तन (Human-Animal Behavior): मानसशास्त्रात मानवी वर्तनासोबतच मानवेत्तर प्राण्यांच्या वर्तनाचा देखील अभ्यास केला जातो. कारण मानसशास्त्रात विविध प्रयोग अगोदर मानवेत्तर प्राण्यांवर केले जातात. त्यानंतर ते मानवाला लागू केले जातात. सर्वप्रथम माणसावर प्रयोग केल्यास तो दगावण्याची शक्यता असते. मानसशास्त्रात उंदीर, कुत्रा, माकड यांसारख्या प्राण्यांवर अनेक प्रयोग केले गेले आहेत.  


३. वर्तन (Behavior): मानवी वर्तन म्हणजे आयुष्यभर अंतर्गत आणि बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देण्याची मानवी क्षमता (मानसिक, शारीरिक आणि सामाजिकदृष्ट्या) आहे. माणूस सकाळ पासून ते रात्री झोपेपर्यंत चौवीस तास आपल्या अंतर्गत आणि बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देत असतो. म्हणून माणूस चौवीस तास अंतर्गत आणि बाह्य उत्तेजनांना (उद्दीपकांना) ज्या क्रिया-प्रतिक्रिया करतो त्याला वर्तन म्हणतात. उदा. तहान लागल्यावर माणूस पाणी पेतो; भूक लागल्यावर जेवण घेतो, थकवा आल्यावर अराम करतो, ह्या सर्व अंतर्गत उत्तेजनाना दिलेला प्रतिसाद आहे. तसेच तो इतरांशी बोलणे, पाहून स्मितहास्य करणे, खेळणे, बाजरातील वस्तू विकत घेणे ह्या बाह्य उत्तेजनांना दिलेला प्रतिसाद आहे. वर्तन हे अनुवांशिक आणि पर्यावरणीय घटकांद्वारे चालते आणि वर्तन करणाऱ्या व्यक्तीच्या आणि इतर लोकांच्या जीवनावर ते परिणाम करते. उदा. आळसी लोक स्वतःच आपल्या प्रगतीत इतर गोष्टींपेक्षा  अडथळा ठरतात. 


४. शास्त्र किंवा विज्ञान (Science): विज्ञान म्हणजे बौद्धिक आणि व्यावहारिक प्रक्रिया ज्यामध्ये निरीक्षण, प्रयोग, मापन करून  भौतिक आणि नैसर्गिक जगाची रचना आणि वर्तनाचा पद्धतशीर अभ्यास समाविष्ट आहे. एखाद्या शास्त्राला विज्ञान म्हणण्यासाठी त्याने, स्पष्टपणे परिभाषित शब्दावली, परिमाणक्षमता, अत्यंत नियंत्रित प्रायोगिक परिस्थिती, पुनरुत्पादकता आणि शेवटी अंदाज आणि चाचणीक्षमता, हे पाच निकष पूर्ण करणे आवश्यक आहे. मानसशास्त्र हे व पाच निकष भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र यांच्या प्रमाणे शंभर टक्के जरी पूर्ण करून शकत नसले तरी त्याच्या जवळपास जाण्याचा प्रयत्न करते. विज्ञान हा निसर्गाला अधिक खोलवर समजून घेण्यासाठी--सत्याच्या जवळ जाण्याचा एक न संपणारा शोध आहे. त्यामुळे विज्ञानाने कोणत्याही विशिष्ट घटनेचे केलेले स्पष्टीकरण कधीही अल्पकाळ ठरेल कारण विज्ञान खूप वेगाने विकसित होते आणि बदलते. माणसाचे वर्तन हे सतत बदलणारे असल्यामुळे मानसशास्त्राचे निष्कर्ष शंभर टक्के आणि सदासर्वकाळ अचूक असू शकत नाहीत. 


मानसशास्त्राच्या अभ्यासाची पाच मूलभूत उद्दिष्टे आहेत:१) मानव आणि प्राणी वर्तनाचे वर्णन करणे. २) मानव आणि प्राणी यांच्या वर्तनाचे स्पष्ट करणे. ३) मानव आणि प्राणी यांच्या वर्तनाचा अंदाज व्यक्त करणे किंवा भाकीत करणे. ४) मानव आणि प्राणी वर्तनाला नियंत्रित  करणे. ५) मानव आणि प्राणी वर्तनात सुधारणा करणे. 


सरावासाठी प्रश्न:

  1. Psychology इंग्रजी शब्द कोणत्या दोन शब्दांपासून तयार झाला?
  2. Psyche या शब्दाचा अर्थ काय आहे?
  3. Logous म्हणजे काय?
  4. "मानसशास्त्र हे मनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे" मानसशास्त्राची ही व्याख्या कोणी केली?
  5. जी. बी. व्हाट्सन या मानसशास्त्रज्ञाने मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली?
  6. "जे मनी वसे, तेच आपल्या वर्तनी दिसे", या म्हणीचा नेमका अर्थ काय आहे?
  7. मानसशास्त्र हे बाह्य वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे; असं जे. बी. व्हाट्सन का म्हणाले?
  8. अंतर्गत वर्तन आणि बाह्य वर्तन यांची उदाहरणे सांगा?
  9. मानवी वर्तनाच्या पाठीमागे कोणत्या प्रक्रिया कार्य करतात?
  10. मानसशास्त्राची आधुनिक व्याख्या सांगा?
  11. मानसशास्त्रात प्राण्यांचा अभ्यास का केला जातो?
  12.  वर्तन म्हणजे नेमकं काय ?
  13. विज्ञान किंवा शास्त्र कशाला म्हणतात?
  14. मानसशास्त्र विज्ञान आहे का?
  15. मानसशास्त्राची पाच उद्दिष्ट कोणती?



Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

भीती जगात नाही, तर मनात आहे..