मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती

  मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती
(Study Methods of Psychology)

मानसशास्त्र हे मानवी मन, मानसिक प्रक्रिया आणि वर्तन यांचा वैज्ञानिक अभ्यास आहे. मानसशास्त्राला मानवी वर्तनाचे विज्ञान म्हणतात. कारण मानसशास्त्रज्ञ देखील इतर शास्त्रज्ञांप्रमाणे विविध संशोधन पद्धतींचा उपयोग करून पद्धतशीर संशोधन आणि प्रयोग करतात.


मानसशास्त्रीय संशोधनामध्ये जटिल मानसिक प्रक्रिया, मानवी वर्तन समजून घेणे आणि विविध प्रकारची माहिती (शारीरिक, मानसिक, शारीरिक आणि लोकसंख्याशास्त्रीय माहिती) गोळा केली जाते. मानसशास्त्रज्ञ विविध संशोधन पद्धती वापरतात. कारण एकाच संशोधन पद्धतीचा वापर केल्यास अचूक आणि विश्वासार्ह निष्कर्ष प्राप्त करणे कठीण असते.


संशोधन माहिती गोळा करण्यासाठी ते कोणत्या पद्धतीचा वापर करतात, ते त्यांच्या संशोधनाच्या प्रकारावर अवलंबून असते. व्यापकपणे, प्रायोगिक संशोधन आणि अप्रायोगिक संशोधन या दोन प्रकारांमध्ये विभागले जाते. मानसशास्त्रीय संशोधनात वापरल्या जाणाऱ्या काही संशोधन पद्धती पुढील प्रमाणे आहेत.  


अ) निरीक्षण पद्धत (Observation Method): निरीक्षण पद्धत ही एक अप्रायोगिक आणि गुणात्मक संशोधन पद्धत आहे, ज्यामध्ये संशोधनाच्या अधीन असलेल्या विषयाचे निरीक्षण केले जाते.


मानसशास्त्रात माहिती संकलनासाठी निरीक्षण पद्धत हे एक उत्तम साधन आहे, कारण अभ्यासकाला (संशोधकाला) संशोधन माहिती संकलित करण्यासाठी कोणत्याही विशेष उपकरणांची किंवा साधनांची आवश्यकता नसते.


आपण आपल्या दिवसभरात अनेक गोष्टींचे निरीक्षण करीत असतो, परंतु मानसशास्त्रीय संशोधनात्मक निरीक्षणे हे आपल्या दैनंदिन निरीक्षणांपेक्षा वेगळे असतात. 


कारण त्यात काही महत्त्वाच्या पायऱ्या असतात, जसे की निरीक्षणाच्या विषयाची निवड करणे, त्या विषयाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निरीक्षणे करणे, निरीक्षणातून मिळालेली माहितीची नोंद करणे, माहिती लक्षात घेऊन तिचे  विश्लेषण करणे, आणि शेवटी निरीक्षणाचा निष्कर्ष काढणे.


निरीक्षणाद्वारे माहिती गोळा करणे, हे निरीक्षकाचे स्वतःचे एक कौशल्य आहे. कारण निरीक्षकाला त्याच्या संशोधनाच्या विषयाची चांगली माहिती असणे आवश्यक आहे. तसेच त्याने आपल्या निरीक्षणावर स्वतःच्या आवडी-निवडी, जात, धर्म, रंग-रूप, नातेसंबंध ह्या गोष्टी बाजूला ठेवून निरीक्षण केले पाहिजे. तेव्हाच निरीक्षणाचे निष्कर्ष प्रामाणिक मिळू शकतात.


निरीक्षकाला गोळा केलेल्या माहितीचे नोंदणी, रेकॉर्डिंग आणि विश्लेषण करण्याच्या योग्य पद्धतींची चांगली समज असणे आवश्यक आहे. निरीक्षणाचे खालील प्रकार आढळतात 


१) नैसर्गिक  निरीक्षण (Natural Observation): जर निरीक्षकाने (संशोधकाने) निरीक्षण करताना खालील घटनांमध्ये कोणताही हस्तक्षेप न करता वास्तविक जीवनात किंवा शाळा, संस्था, घरे, मोकळ्या नैसर्गिक वातावरणात निरीक्षणे केली असतील, तर त्याला नैसर्गिक निरीक्षण म्हणतात.


या प्रकारच्या निरीक्षणामध्ये, संशोधक कोणतीही परिस्थिती हाताळत नाही किंवा त्यावर नियंत्रण ठेवत नाही. तो किंवा ती केवळ निरीक्षणाच्या वर्तनाची त्यांच्या नैसर्गिक वातावरणात नोंद करतो. त्यामुळे निष्कर्ष देखील नैसर्गिक व सामान्य मिळतात.


परंतु नैसर्गिक निरिक्षणांत बाह्य घटकांवर नियंत्रण ठेवणे अशक्य असते, माहितीची गोपनीयता, नैतिक समस्या आणि निरीक्षक पूर्वग्रह या नैसर्गिक निरीक्षणाच्या इतर काही प्रमुख समस्या आहेत.


2) आत्मनिरीक्षण (Introspection): आत्मनिरीक्षण ही स्व-निरीक्षणाची एक पद्धत आहे. आत्मनिरीक्षण करताना, व्यक्ती स्वतःच्या मानसिक स्थितीत डोकावून पाहते आणि स्वतःच्या मानसिक प्रक्रियांचे निरीक्षण करते.


आत्मनिरीक्षण पद्धत ही व्यक्तीला आपल्या स्वतःच्या अनुभवांबद्दल (विचार, भावना, निर्णय आणि वर्तन) माहिती गोळा करण्याची सर्वात जुनी पद्धत आहे.


ही एक आत्म-परीक्षणाची प्रक्रिया आहे, जिथे एखादी व्यक्ती स्वतःच्या भावनांचे निरीक्षण करते, विश्लेषण करते आणि स्वतःलाच अहवाल देते. उदा. समजा तुम्ही आनंदी आहात कि नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये पाहावे लागेल


3) पद्धतशीर निरीक्षण (Systematic Observation): म्हणजे व्यक्ती वर्तनाच्या पैलूंचे बारकाईने परीक्षण करण्यासाठी एक वस्तुनिष्ठ, सुव्यवस्थित पद्धत जेणेकरुन निरीक्षकांच्या स्पष्टीकरणाद्वारे निष्पक्ष व विश्वासार्ह माहिती मिळवता येते.


पद्धतशीर निरीक्षणामध्ये सामान्यत: अचूक क्रिया, गुणधर्म किंवा इतर वर्तनाचे तपशील अचूकपणे व्हिडीओ कॅमेरा, नोंद तक्ता, आरसे, सी.सी. टि. व्ही. कॅमेरा, दुर्बिण यांच्या साह्याने रेकॉर्ड केले जातील आणि गरज पडल्यास त्याचे पुन्हा पुन्हा निरीक्षण करता येईल.


म्हणून काही साधनांच्या साह्याने केलेले निरीक्षण म्हणजे पद्धतशीर निरीक्षण होय.


पद्धतशीर निरीक्षणाचा तत्सम परिस्थितीत, सर्व निरीक्षकांना त्यांच्या निरीक्षणाचे सारखे परिणाम मिळतील याची खात्री करणे हा हेतू आहे. 


ब) केस स्टडी पद्धत (Case Study Method): केस स्टडी पद्धत म्हणजे एखादी घटना, व्यक्ती किंवा समस्येचा सखोल अभ्यास आहे. आपण एखाद्या व्यक्तींबद्दल जितके अधिक माहिती घेतो तितकेच अधिक आपण त्याला समजून घेण्यास आणि मदत करण्यास सक्षम होऊ शकतो; या कल्पनेवर ही पद्धत आधारित आहे.


केस स्टडी पद्धत व्यक्ती (केस) वर्तनाचे मूळ कारणे शोधण्याचा प्रयत्न करते. व्यक्ती (केस) वर्तनाचा इतिहास शोधून काढते आणि त्यावर उपाय योजना सुचविते. उदा. एखाद्या मुलाला अंधाराची भीती वाटत असेल तर ती का वाटते? त्याची कारणे शोधते. भीती केव्हा पासून वाटते? त्याचा इतिहास शोधते आणि भीती नाहीशी कशी करता येईल? त्यावर उपाय सुचविते.


केस स्टडी ही सर्वात जुनी संशोधन पद्धतींपैकी एक आहे; जी विशेषत: मानसशास्त्रातील वर्तन विकारांचे (मनाचे आजार) निदान आणि त्यावर उपचार करण्यासाठी वापरली जाते. 


केस रेकॉर्डमध्ये कौटुंबिक पार्श्वभूमी कशी आहे, घरगुती जीवन कसे आहे, शेजाऱ्यांसोबत नातेसंबंध कसे आहेत? शाळेतील अनुभव कसे आहेत?  आरोग्य कसे आहे? भूतकाळातील जीवन कसे आहे? इत्यादी माहिती समाविष्ट आहे.


केस स्टडी वापरताना संशोधक चाचण्या, चेकलिस्ट, प्रश्नावली, मुलाखत यांच्या साह्याने कौटुंबिक, शालेय आणि ऑफीस मधुन माहिती गोळा करीत असतो. समूहाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी वापरता येत नाही, हि तिची अडचण आहे.


क) मुलाखत पद्धत (Interview Method): आपल्या रोजच्या जीवनात प्रत्येक व्यक्ती इतरांना भेटतो आणि त्याच्याशी काहीतरी चर्चा करतो.


ही मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा या दोघात घडणारी प्रक्रिया आहे.रुग्ण आणि डॉक्टर, विद्यार्थी आणि शिक्षक, ऑफिसर आणि कर्मचारी यांच्यात होणारे दैनंदिन संभाषण ही मुलाखतीची उदाहरणे आहेत.


मुलाखत ही मुलाखत देणार्‍याला व्यक्तीला टेलिफोनद्वारे अप्रत्यक्ष भेटण्याची किंवा काही उद्देशपूर्ण गोष्टींवर चर्चा करण्यासाठी प्रत्यक्ष समोरासमोर संभाषण करण्याची प्रक्रिया आहे.


मुलाखत घेऊन एखाद्या व्यक्तीविषयी माहिती गोळा केली जाते आणि त्या आधारे निष्कर्ष काढले जातात.


सोप्या शब्दात आपण असे म्हणू शकतो की, मुलाखत म्हणजे समस्याप्रधान परिस्थितीबद्दल माहिती मिळविण्यासाठी मुलाखत घेणारा आणि मुलाखत देणारा या दोन व्यक्तींमधील तोंडी संवाद किंवा विविध मार्गानी होणारे द्विमार्गी संभाषण आहे



ड) सर्वेक्षण पद्धत (Survey Method): सर्वेक्षण पद्धत ही एक प्रक्रिया, साधन किंवा तंत्र आहे जी तुम्ही लोकांच्या पूर्वनिर्धारित गटाला प्रश्न विचारून संशोधनात माहिती गोळा करण्यासाठी वापरू शकता.


उदाहरणार्थ, तुम्ही Formplus या अँप्सचा उपयोग करून ऑनलाइन सर्वेक्षण करू शकता किंवा प्रत्यक्ष लोकांना भेटून, त्यांचे एखाद्या गोष्टीविषयी काय मत आहे? हे समजून घेऊ शकता आणि त्या आधारे निष्कर्ष काढू शकता.


समूहाच्या वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी हि पद्धत फार उपयुक्त आहे. पण लोकांकडून खरी माहिती मिळेलच याची खात्री नसते.


इ) प्रायोगिक पद्धत (Experimental Method): आतापर्यंत आपण मानसशास्त्रात वापरल्या जाणार्‍या आत्मनिरीक्षण पद्धती आणि वेगवेगळ्या निरीक्षण पद्धतीचा अभ्यास केला.


परंतु या पद्धतींमध्ये वैज्ञानिक वस्तुनिष्ठता आणि विश्वसनीयता (वैधता) कमी आहे. प्रायोगिक पद्धत ही वर्तनाचा अभ्यास करण्याची सर्वात वैज्ञानिक आणि वस्तुनिष्ठ पद्धत समजली जाते.


याच पद्धतीमुळे मानसशास्त्राला विज्ञानाचा दर्जा मिळाला आहे. या पद्धतीत प्रयोगशाळांमध्ये आणि इतर ठिकाणी नियंत्रित पद्धतींद्वारे कारण आणि त्याचे परिणाम संबंध (Cause & Effect) शोधण्यासाठी प्रयोग केले जातात.


विल्हेल्म वुंड हे या क्षेत्रातील अग्रणी होते. 1879 मध्ये त्यांनी जर्मनीतील लीपझिग विद्यापीठात पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा स्थापन केली. त्यामुळे त्यांना "प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक" मानले गेले.


तसेच, विल्यम जेम्स आणि रुच यांनी प्रायोगिक मानसशास्त्रात पुढे योगदान दिले आहे. एक सुनियोजित प्रायोग करण्यासाठी प्रयोगकर्त्याला अनेक विविध टप्पे पार करावे लागतात. प्रायोगिक पद्धतीचे टप्पे खालील प्रमाणे आहेत. 


1) एक समस्या शोधणे (Find a problem): प्रायोगिक पद्धतीची पहिली पायरी म्हणजे, प्रयोगाची समस्या शोधणे.


दैनंदिन जीवनात अनेक समस्या आपल्या अवतीभोवती असतात. उदा. मोबाइल्सचा अती वापर केल्याने विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रगती कमी होते का? दररोज व्यायाम केल्याने डायबेटीस कमी होतो का? अशा विविध समस्या शोधून त्यावर प्रयोग करता येतो. 



2) गृहीतकाची निर्मिती करणे (Formulation of Hypothesis): प्रयोगाची समस्या गृहितकाच्या स्वरूपात मांडली जाते.


गृहितक म्हणजे प्रयोग करण्यापूर्वीच प्रयोगकर्त्याने प्रयोगाच्या निष्कर्षांविषयी केलेले भाकीत विधान होय. गृहीतके सकारात्मक किंवा नकारात्मक पद्धतीने तयार केले जाऊ शकते.


दररोजच्या व्यायामाचा डायबेटीसवर सकारात्मक परिणाम होईल किंवा दररोजच्या व्यायामाचा डायबेटीसवर नकारात्मक परिणाम होईल. वरील समस्येचे असे गृहीतके तयार होऊ शकतात. गृहीतकाला परिकल्पना असे देखील म्हणतात. गृहीतकाला  प्रयोगाच्या निष्कर्षांद्वारे सिद्ध केले जाऊ शकते किंवा नाकारली जाऊ शकते.  



3) परिवर्तक (Variable): प्रयोगात विविध परिवर्तके असतात. परिवर्तक म्हणजे एक घटना किंवा स्थिती आहे; ज्याची मूल्ये भिन्न असू शकतात आणि मोजले जाऊ शकतात.




मानसशात्रीय प्रयोगात सामान्यपणे स्वतंत्र परिवर्तक, परतंत्र परिवर्तक आणि नियंत्रित परिवर्तक असे तीन प्रकारचे परिवर्तक असतात.


प्रयोगकर्त्याला ज्या परिवर्तकाचे परिणाम दुसऱ्या परिवर्तकांवर काय होतात, ते बघावयाचे असते, त्याला ‘स्वतंत्र परिवर्तक’ म्हणतात. उदा. वरील प्रायोगिक समस्येत व्यायाम हा स्वतंत्र परिवर्तक आहे.


जो परिवर्तक स्वतंत्र परिवर्तकावर अवलंबून असतो आणि प्रयोगकर्ता ज्याचे मापन करतो, त्याला परतंत्र परिवर्तक म्हणतात. उदा. वरील समस्येत डायबेटीस हा ‘परतंत्र परिवर्तक’ आहे.


प्रयोगाचे निष्कर्ष अचूक येण्यासाठी प्रयोगकर्ता काही परिवर्तकांना नियंत्रित करीत असतो. उदा. वरील समस्येत डायबेटीस रुग्णांचे वय, त्यांच्या डायबेटीसची पातळी, व्यायामाचा प्रकार, व्यायामाचे ठिकाण आणि वेळ, डायबेटिसच्या गोळ्यांचे प्रमाण इ. गोष्टी नियंत्रित परिवर्तके असतील. म्हणून प्रयोगकर्ता ज्या परिवर्तकांना नियंत्रित ठेवतो त्यांना ‘नियंत्रित परिवर्तक’ म्हणतात. 


4) प्रयोगाची प्रक्रिया(Procedure of Experiment):

प्रयोगकर्ता वरील सगळे टप्पे लक्षात घेऊन प्रयोगाची मांडणी करतो. ज्या लोकांवर प्रयोग करावयाचा आहे, अशा अपेक्षित लोकांची निवड करतो. त्यांचे दोन गट बनवितो. एकाला प्रायोगिक गट असे नाव देतो आणि दुसऱ्याला नियंत्रित गट असे नाव देतो.


प्रयोग सुरु करण्यापूर्वी दोन्ही गटातील लोकांची डायबेटीस पातळी मोजतो. त्यानतंर प्रयोगाला सुरुवात करतो. प्रायोगिक गटाला तीन महिने व्यायाम करण्यास सांगतो तर नियंत्रित गटाला कोणताही व्यायाम करण्याची परवानगी नसते.


तीन महिन्यानंतर पुन्हा दोन्ही गटाची डायबेटीस पातळी मोजली जाते. जर प्रायोगिक गटाची डायबेटीस पातळी नियंत्रित गटापेक्षा कमी आढळून आली असेल तर तो व्यायामाचा परिणाम आहे, असा निष्कर्ष काढला जातो.


5) निष्कर्ष आणि मर्यादा(Conclusion & Limitations): प्रयोगकर्ता मिळालेल्या माहितीचे संख्याशास्त्रीय विश्लेषण करतो आणि त्या आधारे निष्कर्ष काढतो. तसेच तो त्याच्या प्रयोगाच्या मर्यादा देखील सांगतो. उदा. वरील समस्येचा निष्कर्ष "दररोजच्या व्यायामाचा डायबेटिस नियंत्रणात सकारात्मक परिणाम दिसून येतो" असा निष्कर्ष काढला जाईल.  


Comments

Popular posts from this blog

OE- Psychology of Happiness

FYBA SEM II