मानसशास्त्राचे आधुनिक दृष्टीकोन

 


मानसशास्त्राचे आधुनिक दृष्टीकोन

(Modern Perspective of Psychology)


मानसशास्त्राचे आधुनिक दृष्टीकोन मानवी मेंदू कसे कार्य करतो? माणूस वर्तन का करतो? याचा अभ्यास करण्यासाठी अनेक मानसशास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासुन संशोधन करीत आहेत. या संशोधकांनी प्रत्येकाने स्वतःच्या काही कल्पना मांडल्या आहेत. त्याला मानसशास्त्रातील विविध दृष्टिकोन म्हणतात. आजही नवनवीन संशोधन सुरुच आहेत. तरीही बरेच प्रश्न अद्यापही अनुत्तरीत आहेत. उदाहरणार्थ, 1870 च्या उत्तरार्धात आणि 1900 व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळात मानसशास्त्राचा अभ्यास जगभरातील अनेक ठिकाणी सुरू झाला होता. हे संशोधन सुरू करणाऱ्या पहिल्या लोकांपैकी एक होते विल्हेल्म वुन्ट, ज्यांना आज “मानसशास्त्राचे जनक” म्हणून ओळखले जाते. 1879 च्या सुमारास जर्मनीतील लीपझिग येथे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा उघडणारे ते पहिले संशोधक होते. तिथे त्यांनी मानसशास्त्रात मापन करण्याचा पहिला प्रयत्न केला. या प्रयोगात एक चेंडू चेंडू वरून खाली आपटल्यापासून ते निरीक्षकाला जाणवण्यापर्यंत किती वेळ लागतो; यांचं मापन केले जात होते. यालाच मानसशास्त्रात 'रिअक्शन टाईमचे मापन' असं म्हटलं जातं. या प्रयोगापासूनच मानशास्त्राला हे शास्त्र म्हणून ओळख प्राप्त झाली. मानसशास्त्राचे काही आधुनिक दृष्टिकोन खालीलप्रमाणे आहेत


अ) वर्तनवाद (Behavior): 1910 च्या सुमारास, जॉन वॉटसनने मानसशास्त्रातील अभ्यासाचे विषय म्हणून मन आणि जाणिवेच्या संकल्पना नाकारल्या. त्यांचा असा विचार होता की, मानसशास्त्राने निरीक्षण करण्यायोग्य आणि सत्यापित करण्यायोग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. मन हे निरीक्षण करण्यायोग्य नसल्यामुळे आणि मनाचा अभ्यास करण्याची आत्मनिरीक्षण पद्धत हि व्यक्तिनिष्ठ पद्धत असल्याने ती शास्त्रशुद्ध नाही. अंतर्गत प्रक्रिया जसे की विचार करणे, भाव-भावना, हेतू देखील त्याने नाकारले कारण ते वस्तुनिष्ठपणे मोजले जाऊ शकत नाहीत, असा त्याचा विश्वास होता. त्याने मानसशास्त्राची व्याख्या मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र अशी केली. वर्तन हे निरीक्षणयोग्य आहे, मोजमाप करणे योग्य आहे आणि म्हणून वर्तनाचा वैज्ञानिक पद्धतीने वस्तुनिष्ठपणे अभ्यास केला जाऊ शकतो, असे प्रतिपादन त्याने केलं. एका प्रयोगात त्यानं चक्रव्यूहात उंदरांना सोडलं. त्या उंदरांना बाहेरचा रस्ता कसा शोधता येतो? हे त्याला शोधायचं होतं. जर त्या ठिकाणचे सर्व वास नष्ट केले; तर त्यांना तो रस्ता सापडतो का? उंदरांचे डोळे बांधल्यावर त्यांना तो रस्ता सापडतो का? उंदरांवर शस्त्रक्रिया करून त्यांची घाणेंद्रिये निकामी केली तर त्यांना बाहेरचा रस्ता सापडतो का? त्यांची श्रवणेंद्रिये निकामी केली तर त्यांच्या शिकण्यावर काही परिणाम होतो का? हे सगळं शोधण्यासाठी त्याने बरेच प्रयोग केले. उंदरांच्या वर्तनाचे आपण निरीक्षण करू शोकतो, त्याच्या वर्तनाचे मापन करू शकतो, हेच त्याला या प्रयोगातून सिद्ध करायचं होतं. पुढे पाव्हलॉव्ह, थॉर्नडाइक आणि स्किनर सारख्या सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञांनी वर्तनवादी दृष्टीकोनाचा पुढे प्रचार-प्रसार केला. 


ब) जैवमनोसामाजिक दृष्टिकोन (Biopsychosocial Perspective):  माणूस हा जैविक, मानसिक आणि सामाजिक अशा तीन घटकांनी मिळून बनला आहे. जैविक (शारीरिक) घटकांचा विचार केल्यास माणूस अनेक पेशी, अणू आणि रेणू यांनी बनला आहे. मानसिक घटकांचा विचार केल्यास विचार प्रक्रिया, भावना, समज-गैरसमज, कल्पना आणि तर्कशक्ती यांनी मिळून बनलेला आहे. तसेच सामाजिक घटकांचा विचार केल्यास  माणूस केवळ हाडामांसाचा गोळा नाही तर सामाजिक रूढी, परंपरा, संस्कृती, जात, धर्म, शाळा यासारख्या अनेक घटकांच्या प्रभावाखाली जगणारा सामाजिक प्राणी आहे. जैविक, मानसिक आणि सामाजिक या तिन्ही घटकांचे संयोगाला 'जैवमनोसामाजिक दृष्टिकोन' म्हणतात. हे तिन्ही घटक भिन्न वाटत असले तरीही त्यांच्यात परस्पर संबंध आढळतो. डॉ. जॉर्ज एंगेल आणि डॉ. जॉन रोमानो यांनी हा दृष्टिकोन १९७७ मध्ये मांडला. मानवी वर्तन समजून घेण्यासाठी कोणतीही एक बाजू लक्षात घेऊन चालणार नाही, तर या तिन्ही बाजू लक्षात घेतल्या पाहिजे असा त्यांचा विश्वास होता.


क) बोधात्मक दृष्टीकोन (Cognitive Psychology): आपल्याला जगाबद्दल माहित कशी मिळते  यावर लक्ष केंद्रित करते. माणसाला सभोवतालच्या परिस्थितीची जाणीव त्याच्या डोळे,नाक,त्वचा, जीभ आणि कान या पंचेंद्रियांनी होते. डोळ्यांनी पाहतो, नाकाने गंध, जिभेने चव आणि कानाने आवाज समजतो. ह्याच पाच जाणिवेला अनुभूती (अनुभव) म्हणतात. अनुभूती ही जाणून घेण्याची प्रक्रिया आहे; असा त्यांचा विश्वास आहे. यात विचार करणे, समजून घेणे, लक्षात ठेवणे, समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि इतर अनेक मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो ज्याद्वारे आपले जगाचे ज्ञान विकसित होते. हे ज्ञान मानवांना पर्यावरणाशी व्यवहार करण्यास आणि त्यांच्याशी जुळवून घेण्यास मदत करते. बोधात्मक (संज्ञानात्मक) दृष्टीकोन मानवी मनाकडे संगणकासारखी माहिती प्रक्रिया प्रणाली म्हणून पाहतो; जी माहिती प्राप्त करते, प्रक्रिया करते, रूपांतरित करते आणि संग्रहित करते. मानव त्यांच्या शारीरिक आणि सामाजिक वातावरणाचा शोध घेऊन त्यांचे मन सक्रियपणे तयार करत असल्याचे दिसते. जीन पियाजे हे या दृष्टिकोनाचे प्रणेते आहेत. हा दृष्टीकोन 1950 च्या दशकातील बोधात्मक क्रांतीचा परिणाम आहे, जो बोधात्मक प्रक्रियांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन आणि माहिती संकलित केल्यामुळे आला आहे, ज्याने वैज्ञानिकांना नवीन अंतर्दृष्टी दिली. 


ड) मनोविश्लेषण दृष्टीकोन (Psychoanalytic Perspective): मनोविश्लेषण दृष्टीकोन सिग्मंड फ्रायडने यांनी स्थापित केला होता. त्याने मानवी वर्तन हे व्यक्तीच्या अबोध इच्छा आणि संघर्षांमधील परस्परसंवादाचा परिणाम असल्याचे सांगितले आहे. मानवाला त्यांच्या सुखाच्या अबोध इच्छेने प्रेरित केले जाते; जी  सहसा लैंगिक स्वरूपाची असते. अबोध इच्छांच्या तृप्तिसाठी तो वर्तन करतो असा त्याचा विश्वास होता. मनोविश्लेषण ही मनोवैज्ञानिक विकार समजून घेण्यासाठी आणि त्यांना बरे करण्यासाठी वापरली जाणारी प्रणाली होती. आपल्या रूग्णांवर उपचार करण्यासाठी, फ्रॉइडने संमोहन आणि फ्री असोसिएशन वापर केला. ज्यामुळे मनातील संघर्ष किंवा चिंता समजून घेण्याचा प्रयत्न तो करीत असे. फ्री असोसिएशन पद्धतीत तो रुग्णाला बेडवर आरामात झोपवून मुक्तपणे बोलायला संधी देत असे. रुग्णाच्या मनातल्या भावनांचा निचरा होत असल्यामुळे त्याला देखील बरे वाटत असे. फक्त यात एकच बंधन होतं, ते म्हणजे रुग्णाने त्याच्या मनात आलेला प्रत्येक विचार व भावना व्यक्त केल्या पाहिजे. मत ते विचार कितीही वाईट असोत, कितीही हिंसक असोत, कितीही अमानुष, अनैतिक अथवा विक्षिप्त असोत. तो त्या रुग्णांना बऱ्याच वेळ बोलायला लावत असे. त्यांच्यावर तो कोणतीही टीका करीत नसे. त्याला नैतिक-अनैतिक यापैकी कोणतीही मोजपट्टी लावत नसे आणि तो शांतपणे त्याच्या बोलण्याचा अर्थ लावत बसत असे. यामधून तो रुग्णाच्या मनाचे विश्लेषण करीत असे. फ्राईड नंतर अनेक मानसशास्त्रज्ञानी पुढे मनोविश्लेषणावर काम केले. जसे की, कार्ल जंग, ओटो रँक यांनी फ्रॉइडच्या मनोविश्लेषणावर आधारित त्यांचे स्वतःचे सिद्धांत विकसित केले आणि हे सिद्धांत सायकोडायनामिक दृष्टीकोन तयार करतात. 


इ) विकासात्मक दृष्टीकोन(Developmental Perspective): हा सिद्धांत एखाद्या व्यक्तीच्या विकास प्रक्रियेतील तीन मुख्य प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करतो. पहिला प्रश्न हा आहे की, मुलाच्या विकासात निसर्ग (nature) किंवा पालनपोषण (nurture) महत्त्वाचे आहे का? दुसरा प्रश्न हा आहे की, मानवाचा विकास टप्प्याटप्प्याने होतो की सतत? शेवटचा तिसरा प्रश्न म्हणजे मानवाचे जीवन बदलते आहे कि स्थिर? आणि कोणते घटक स्थिर राहतात व कोणते घटक बदल. विकास दृष्टीकोन सामाजिक, शैक्षणिक आणि शारीरिक वाढ यासारख्या विविध क्षेत्रांना संबोधित करतो. या आघाड्या समजून घेणे लोकांना स्वतःला जाणून घेण्यास मदत करते. लहानपणी लोकांना भेडसावणाऱ्या अनेक समस्या असतात आणि  लहान मुलांना भेडसावणाऱ्या काही समस्यांचे निराकरण करण्यात हा दृष्टिकोन मदत करू शकते. 1877 मध्ये, प्रसिद्ध उत्क्रांतीवादी जीवशास्त्रज्ञ चार्ल्स डार्विन यांनी जन्मजात संप्रेषण प्रकारांवर विकासात्मक मानसशास्त्राचा पहिला अभ्यास केला. 


ई) मानवतावादी दृष्टीकोन (Humanistic Perspective): माणसं मुळात चांगली, स्वतःच्या आयुष्याचा तोल सांभाळणारी असतात पण मानसिक आणि सामाजिक समस्यांमुळे त्यांचं नैसर्गिक वागणं बदलत जातं. हि मानवतावादी मानसशास्त्राची मूळ कल्पना आहे. मानवतावादी दृष्टीकोनात प्रेम, अहिंसा, शांती, आनंद, सहवास आत्म-मूल्य आणि स्वायत्तता यांचा मानवाच्या विकासात असलेला वाटा शोधला जातो.मानवतावादी मानसशास्त्रज्ञांसाठी 'स्व' (Self) ची संकल्पना अत्यंत महत्त्वाची मानली आहे. ते मनोविश्लेषणाशी असहमत होते. लोक त्यांच्या अबोध लैंगिक इच्छांमुळे वर्तन करतात, या मनोविश्लेषणवाद्यांच्या विचारांवर त्यांचा विश्वास नव्हता. त्यांनी वर्तनवादी दृष्टीकोन देखील नाकारला आणि मानवी वर्तन केवळ एखाद्याच्या पर्यावरणीय उदीपकाशी परस्परसंवादाद्वारे निर्धारित केले जाते यावर त्यांनी विश्वास ठेवला नाही. लोकप्रिय मानवतावादी मानसशास्त्रज्ञांमध्ये अल्फ्रेड एडलर, अब्राहम मास्लो, कार्ल रॉजर्स हे या दृष्टिकोनाचे पुरस्कर्ते आहेत.   प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य त्याची नितीमुल्ये आणि निवड करण्याची पद्धत यावर ठरतं. हि निवड योग्य असेल तर त्या व्यक्तीची अर्थपूर्ण आणि समाधानी आयुष्याकडे वाटचाल सुरु होते. पण यासाठी माणसाला स्वतःच्या अनुभवावरून त्याची नीतिमूल्यं ठरविता यायला हवीत. दुसऱ्याची नीतिमूल्ये आंधळेपणाने स्वीकारू नये. दुसऱ्याचे अंधानुकरण केलं तर स्वतःच्या अनुभवांची नाळ तुटते आणि स्वतःच्या भावनांशी नातं तुटायला लागतं. स्वतःशी नातं तुटल्यामुळे एखाद्याच्या आयुष्याला दिशा मिळू न शकल्यास नैराश्यासारखे मनोविकार निर्माण होऊ शकतात, असा त्यांचा विश्वास होता.


सरावासाठी प्रश्न :

१. आधुनिक मानसशास्त्राचा जनक कोणाला म्हणतात?

२. मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा कोणी,कुठे आणि केव्हा सुरु केली?

३. रिअक्शन टाईम म्हणजे काय?

४. वर्तनवादाचा प्रणेता कोण आहे?

५. वर्तवादानुसार मानसशास्त्राची कोणती व्याख्या केली जाते?

६. प्रसिद्ध वर्तनवादी मानसशास्त्रज्ञांची नावे सांगा.

७. माणसाला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची जाणिव कशाने होते?

८. बोधात्मक दृष्टिकोनाचा प्रणेता कोण आहे?

९. मनोविश्लेषणवाद कोणी मांडला?

१०. मनोविश्लेषणासाठी फ्रॉइड कोणत्या पद्धतीचा वापर करीत असे ?

११. विकासात्मक दृष्टिकोन कोणी मांडला?

१२. जैवमनोसामाजिक दृष्टिकोन कोणी मांडला?

१३. मानवतावादी दृष्टिकोनाचा प्रणेता कोण आहे ?

१४. मानवतावादाची मूळ कल्पना कोणती आहे ?

१५. मानवाला संगणकीय प्रणाली कोणत्या दृष्टिकोनात म्हटले जाते ?


प्रा. डॉ. एन. एस. डोंगरे

मानसशास्त्र विभाग

एस पी डी एम महाविद्यालय, शिरपूर








Comments

Popular posts from this blog

FYBA SEM II

मानसशास्त्राची ओळख

भीती जगात नाही, तर मनात आहे..